दूषित सांडपाण्यामुळे भातशेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:44 AM2019-11-13T00:44:51+5:302019-11-13T00:44:55+5:30
रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली आहे.
नागोठणे : येथील रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली आहे. यामुळे काहीअंशी हातात आलेली भातशेती नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
येथील रिलायन्स कंपनीतून निघणारे रसायनमिश्रीत दूषित पाणी समुद्रात नेण्यासाठी कंपनी ते धरमतर खाडीपर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन बहुतांशी या मार्गातील शेतांमधूनच टाकण्यात आली आहे. ही वाहिनी जीर्ण झाली असल्याने अनेकदा फुटत असते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. या वर्षी पावसाने तयार झालेले भाताचे पीक शेतकºयांच्या हातातून गेले असताना उरले सुरले पीकही ही सांडपाणीवाहिनी फुटल्याने भिजले आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. याचा फटका आटीवलीतील ठकीबाई हिरू पाटील, विठाबाई रामदास पाटील, शांताराम गोविंद पाटील, बाळाराम पदू पाटील, दामोदर कमळ्या म्हात्रे, यशवंत अंबाजी गदमले आणि गांधे गावातील हिराचंद्र हाशा गदमले, लता देवराम गदमले, भाऊ रामा गदमले या शेतकºयांना बसला आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल यांच्या म्हणण्यानुसार या वाहिनीतून रात्रीच्या दरम्यान उच्चदाबाने सांडपाणी सोडले जाते व या गळतीमुळे हे पाणी शेतात पसरते, असे त्यांनी स्पष्ट केले. ही सांडपाणीवाहिनी अनेकदा फुटत असल्याने शेती नापीक व्हायची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. वाहिनीची गळती झाल्यानंतर कंपनीकडून तुटपुंजी अशी नुकसानभरपाई दिली जात असल्याने हा प्रकार थांबविण्यासाठी आटीवली, गांधे, मुंढाणी, चोळे भागातील शेतकºयांच्या सहकार्यातून लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतात असणाºया तलावातील मासळीही या दूषित पाण्यामुळे मृत झाली असल्याचे एका शेतकºयाने सांगितले. शेतात कापून ठेवलेली भातशेती बाहेर काढण्यासाठी शेतात जाणे गरजेचे असते. मात्र, शेतात हे दूषित सांडपाणी साचून राहत असल्याने आत गेल्यावर अंगाला खाज सुटते, फोड येतात, असे शेतकºयांनी सांगितले. या सांडपाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणार असल्याचे वसंत मोकल यांनी सांगितले. याबाबत रिलायन्स कंपनीच्या एका जबाबदार अधिकाºयांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.