पनवेलमध्ये 6300 हेक्टरवर होणार भातशेती, शेतकऱ्यांची पेरणीसाठी नांगरणीला सुरुवात
By वैभव गायकर | Published: June 11, 2024 03:56 PM2024-06-11T15:56:23+5:302024-06-11T15:58:02+5:30
मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली.
पनवेल: पेरणी योग्य पाऊस झाल्याने पनवेल मधील शेतकरी आपल्या शेतात नागरंणी करीत असून धान पेरणीच्या कामाला लागला आहे. यावर्षी कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात 6300 हेक्टरवर भातशेती केली जाणार आहे.
पनवेल तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे.तालुक्यात आंतराष्ट्रीय विमानतळ आल्याने जमिनींना सोन्याचे भाव प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दरवर्षी झपाट्याने कमी होत आहे. मात्र असे असले तरी बहुतांशी शेतकरी आपला परंपरागत शेती व्यवसाय करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत तसेच खत टाकणे, पार, धुरे दुरुस्त करणे, शेतीची सफाई करणे इत्यादी कामे जवळपास संपविली होती. मृग लागला की पऱ्हे टाकायचे या तयारीत शेतकरी होते. परंतु शेतकऱ्यांना पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीची नागरणी करणे आवश्यक असते. अशात प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत होता.
मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने सगळ्या शेतकऱ्यांची कामे सुरु झाली. प्रत्येक शेतकरी धान खरेदी करुन किंवा मागील वर्षीचे ठेवलेले बियाणे वापरुन पेरणी करीत आहेत. पनवेल तालुक्यात मॉन्सूनचे आगमन सामान्यत: 7 ते 10 जून पर्यंत होत असते. त्यानुसार पावसाने हजेरी लावली आहे. अशात मशागत करुन ठेवलेल्या शेतात पेरणीला सुरुवात केली तर ते व्यवस्थित उगवतात, असा समज असून अनेकांचे प्रयोग यशस्वी होतात. परंतु यंदा लगेच पावसाने हजेरी लावल्याने आणि सगळ्यांना पेरणीची संधी लाभली.
समाधानकारक पावसाची अपेक्षायंदा हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास केला तर मान्सून चांगला येणार असून पिकासाठी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. आजचा शेतकरी काही प्रमाणात आपल्या पारंपरिकरित्या पावसाचा अंदाज लावतात. परंतु आता जास्तीत जास्त शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवू लागला आहे. अनेकवेळा हवामान खात्याचे भाकित सुद्धा फोल ठरते.
6300 हेक्टरवर पेरणी होणार आहे.पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरक एवढा पाऊस झाला आहे, असे पनवेल तालुका कृषी अधिकारी तानाजी दौलतोडे म्हणाले.