दिघी : श्रीवर्धन तालुक्यासह जिल्ह्यात परतीचा पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक भागात हलक्या सरीने सुरू झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या पावसामुळे उत्साहावर विरजण पडले आहे.
तालुक्यात मागील पावसाच्या आपत्तीने आधीच संकटात आलेला शेतकरी या नव्या आपत्तीने पुरता खचला आहे. त्याच्या हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत हिरावला जात आहे. बोर्ली पंचतन परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजल्यापासून हलक्या सरीने सुरू झालेल्या पावसाने दोन दिवस ढगाळ वातावरणासह धुडगूस घातला आहे. या वेळी समुद्रकिनारा परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर शिस्ते, वडवली, वेळास, दिवेआगर, खुजारे, मेंदडी आदी परिसरात पाऊस झाला.
शेखाडी येथे पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात कापणीसाठी आलेल्या भातशेतीला आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे.बोर्ली-पंचतन जवळील काही गावांमध्ये शुक्रवार सकाळपासून ढगाळ हवामान होते. दुपारी संततधार सुरूच राहिल्याने भातपिके बाधित होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.