भात कापणीचा दर वाढल्याने बळीराजा हवालदिल, भातपीकाचे उत्पादन वाढले
By निखिल म्हात्रे | Published: November 20, 2023 04:18 PM2023-11-20T16:18:42+5:302023-11-20T16:19:52+5:30
400 ते 500 रुपयांची रक्कम मजुरांना भात कापणीसाठी घ्यावे लागत आहे.
निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - चालू हंगामात उत्तम भातशेती आलेल्या बळीराजाच्या भातपिकावर पावसाने आक्रमण केल्यानंतर पाऊस पडल्याने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा पार खचून गेला आहे. आडवी झालेल्या भातशेतीमध्ये भात पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा तूर्त हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे भात कापणीसाठी लागणारा मजुरदार मिळेनासा झाल्याने चढ्या भावाने म्हणजेच 400 ते 500 रुपयांची रक्कम मजुरांना भात कापणीसाठी घ्यावे लागत आहे.
पावसामुळे कापणीचा हंगाम सर्वत्र एकाच वेळी आल्याने मजुरांनी आपल्या मजुरीत वाढ केली असून, वाढत जाणाऱ्या मजुरीचा दर शेतकऱ्यांसाठी मारक ठरु लागला आहे. 400 ते 600 रु. मजुरी देवून कामगार घ्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आपली शेती नकोशी झाली असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. भाताच्या उत्पन्नापेक्षा मजुरी अधिक द्यावी लागत असून, शेतकरी हवालदील झाला आहे.
यावर्षी सुरुवातीपासून पावसाने उत्तम साथ दिल्याने बळीराजाच्या शेतात चांगल्या प्रकारे भाताची कणसे तयार झाली आणि सोन्यासारखी भात शेती पिवळी होऊ लागली. उत्तम भातशेती बघुन बळीराजाही आनंदीत दिसत होता. आपल्याला भरघोस भात पिकणार या आशेवर शेतकरी समाधान व्यक्त करत होता. मात्र, चांगल्या प्रकारे आलेल्या भातशेतीवर पावसाने आक्रमण केल्यास हाती आलेले भातही पाऊस हिरावून घेणार की, काय अशी भिती शेतकऱ्यांना वाटत होती.
या पडलेल्या भातशेतकडे पाहून शेतकरी मात्र गहिवरुन जात आहे. त्यामुळे भात कापणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. हाती आलेले पिक पावसाने हिरावून घेतल्याने वर्षभर मेहनत करुन भरघोस आलेले भाताचे पिक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पिकवावी कि नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करु लागला आहे. एकीकडे शेतात उत्तम प्रकारे आलेले भात, वादळी वाऱ्यासह जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुसान झाले तर दुसरीकडे मजुरदारांनी वाढत्या मजुरीची संधी न सोडता मजुरीवाढीसाठी अडून बसलेल्या मजुरदारांना विनंत्या करुन कोणी 400, कोणी 500 तर कोणी 600 रुपये मजुरीचा दर ठरवून त्याचबरोबर मजुरांना उत्तम प्रकारे जेवण, दोन वेळचा चहा-नाश्ता तसेच येण्या-जाण्याचा उतार खर्च असा सगळा थाट पाहता यावर्षी शेतकऱ्यांपेक्षा मजुरदारांची दिवाळी भरभराटीची चालली असल्याचे बोलले जात आहे.
असा सगळा थाट-माट मिळत असल्याने आदिवासी बांधव व अन्य मजुरदार पेणच्या कामागार नाक्यावर आनंदाने कामावर जाण्यासाठी हजर असतात. या कामगारांना नेण्यासाठी स. 5 वाजल्यापासून शेतकऱ्यांची धावपळ सुरु असते. यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सर्व शेतकऱ्यांची भात कापणी एकाच वेळी आल्याने मजुरदार मिळेनासा झाला असल्याने मजुरदारांचा भाव चांगलाच वधारला आहे.