- संजय गायकवाडकर्जत : माथेरानमध्ये २५ जानेवारी रोजी एका पर्यटकाचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. यात त्या पर्यटकाने हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारच्या दुर्घटना माथेरानमध्ये दरवर्षी घडतात. पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने माथेरानमध्ये घोडेस्वारी करीत असाल तर हेल्मेट असेल तरच सवारी करा, असे आवाहन आता नगरपालिका प्रशासनानेही केले आहे.
दरम्यान, या समस्येबाबत पाेलिसांबरोबर लवकरच एक बैठक घेणार असल्याचेही नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माथेरानमध्ये २५ जानेवारी रोजी आपल्या पत्नीसह फिरायला आलेल्या मोहम्मद काशीद इम्तियाज शेख (वय २३) या तरुणाचा घोड्यावरून पडून अपघात झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेल्मेट नसल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दोन वर्षांपूर्वी समीर बांदेकर यांनी घोडेस्वारी सुरक्षिततेसाठी मोफत हेल्मेट वाटप केले होते. मात्र, काही दिवसांतच हेल्मेट वापरणे बंद झाले. एवढे मृत्यू होऊनदेखील पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचे घोडा हे प्रमुख आकर्षण आहे. येथे येणारा पर्यटक घोड्यावरून फिरायला जात नाही असे होत नाही. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची आहे.
पोलिसांसोबत बैठक घेऊन सरकारने ठरवून दिलेल्या अटींनुसार घोडेचालक यांना नियमावलीची सक्ती करणार आहे. नगर परिषद याबाबत सकारात्मक आहे, शेवटी पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.- सुरेखा भणगे, मुख्याधिकारी, माथेरान नगर परिषद.
सुरक्षेसाठी काय करावे?घोड्यावर बसणाऱ्या पर्यटकांना हेल्मेट सक्तीचे करावे. घोड्याची देखभाल करणारा कामगार प्रशिक्षित आहे किंवा नाही याची पोलिसांनी तपासणी करावी.
यापूर्वीच्या दुर्घटना १९९७ एका विदेशी पर्यटकाचा घोडा उधळल्याने लुईझा पाॅइंटवरून दरीत पडून घोड्यासह मृत्यू. २०१५ इंडिया मेहयू ही परदेशी पर्यटक घोड्याच्या पायाखालील येऊन मृत्युमुखी. २०१६ निलीम सिंग हिचा एको पाॅइंटदरम्यान घोड्यावरून पडून मृत्यू. २०१८ ग्रँट रोड येथील रहिवासी रशिदा रेडिओवाला हिला गंभीर दुखापत, तर भिवंडीतील रहिवासी अश्रफ खानदेखील दस्तुरी नाक्यावर पडून दुखापत.