मीटरमध्ये हेराफेरी ; ३० वीज ग्राहकांना दंड
By admin | Published: February 24, 2017 06:49 AM2017-02-24T06:49:07+5:302017-02-24T06:49:07+5:30
घरगुती वीज मीटरचे रिंडिंग कमी येण्यासाठी त्या मध्ये हेराफेरी करणाऱ्या डहाणूतील तीस ग्राहकांवर
अनिरु द्ध पाटील / बोर्डी
घरगुती वीज मीटरचे रिंडिंग कमी येण्यासाठी त्या मध्ये हेराफेरी करणाऱ्या डहाणूतील तीस ग्राहकांवर महावितरणच्या विशेष पथकाने कारवाई केली. दरम्यान दोषीं ग्राहकांना दंड ठोठावण्यात आला असून तो विशिष्ट मुदतीत रक्कम न भरल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविला जाणार आहे.
डहाणूतील शहरी भागातल्या फोर्ट आणि आगर परिसरातील काही वीज ग्राहकांचे महिन्याच्या मीटर रीडिंगमध्ये घट झाल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले होते. अशा ग्राहकांच्या घरातील विजेची उपकरणे, त्यांचा वापर आणि प्रत्यक्ष रीडिंग या मध्ये तफावत आढळून आली. त्यानुसार विशेष पथकाने संयुक्तरित्या ही मोहीम राबवली. या कारवाईबाबत डहाणू कार्यालयाला सुगावाही लागू दिला नाही. या कारवाईत सुमारे तीस ग्राहक दोषी आढळून आले त्यांना कंपनीच्या नियमांनुसार आर्थिक दंड ठोठावण्यात आला असून ती रक्कम विशिष्ट मुदतीत भरावयाचा आहे. तो न भरल्यास महावितरणच्या कल्याण पोलीस ठाण्याअंतर्गत कलम १३५/१२६ नुसार गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती डहाणू कार्यालयाने दिली. त्यामुळे आगामी काळात वीज चोरीला आळा बसण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. मात्र हे वीजचोर मीटरमधील ही हेराफेरी कशी करीत होते याबाबत अधिक तपशील मात्र या कारवाई पथकाने दिला नाही. (वार्ताहर)