रोहा-कोलाड रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या
By Admin | Published: July 3, 2017 06:36 AM2017-07-03T06:36:10+5:302017-07-03T06:36:10+5:30
रोहा-कोलाड रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर आहे. रहदारीला अडथळा ठरणारी ही मोकाट गुरे सध्या अपघाताला कारणीभूतच
लोकमत न्यूज नेटवर्क
धाटाव : रोहा-कोलाड रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर आहे. रहदारीला अडथळा ठरणारी ही मोकाट गुरे सध्या अपघाताला कारणीभूतच ठरत आहेत. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या मोकाट गुरांबाबत संबंधितांकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुंबई-गोवा या राज्य महामार्गाला कोलाड येथे जोडलेला रोहा-कोलाड रस्ता हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. धाटाव परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या अनेक कारखान्यांत रोजीरोटीसाठी कामगार रोह्यातील ग्रामीण भागांतून कामानिमित्त येत असतात, तर शालेय विद्यार्थीसुद्धा सायकलवरून प्रवास करताना दिसतात. त्यातच दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबर अवजड वाहनांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सामावेश आहे. सतत वर्दळीच्या या रस्त्यावर मात्र दिवसरात्र जागोजागी मोकाट गुरांचा प्रचंड प्रमाणात वावर होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातच विजेच्या खेळखंडोब्यामुळे रात्री रस्त्यात बसलेली गुरे नजरेस न आल्यामुळे अपघात घडून अनेक जण जखमी, तर काहींना कायमचे अपंगत्व आले असल्याच्या कित्येक घटना घडल्याचे प्रवासी सांगतात.
गुरांच्या या कळपामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडीसुद्धा होते. त्यामुळे याबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
म्हसळ्यातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : शहरात सध्या मोकाट जनावरांचा वावर सुरू असल्याने रहदारीला अडथळा ठरणारी ही मोकाट गुुरे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या मोकाट गुरांबाबत संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे प्रवासी वर्गातून सांगितले जात आहे.
म्हसळा शहर प्रामुख्याने सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालये त्याचप्रमाणे बाजारहाट करण्यासाठी प्रमुख केंद्र असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या ग्रामीण भागातील नागरिकांना येण्यासाठी एसटी किंवा रिक्षा हेच साधन आहे. मात्र, रस्त्यावर एकापाठोपाठ असा गुरांचा कळप असल्याने रहदारीस अडथळा होऊन वाहतूककोंडी होत आहे. एकीकडे म्हसळ्यातील अरुंद रस्ते त्यामध्ये दुतर्फा उभी असलेली वाहने आणि या मोकाट जनावरांचा वावर शहरवासीय त्याचप्रमाणे येणाऱ्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पावसामध्ये विजेचा लपंडाव सुरू असतो, त्यामध्ये ही गुरे न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी या मोकाट जनावरांबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी म्हसळाकरांकडून होत आहे.