पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या काही दिवसांत दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास धामणदेवी हद्दीत दरड कोसळली तर शनिवार पहाटे ४ वाजताच्या सुमारास पोलादपूरनजीक चोळई गावहद्दीत दरड कोसळली. यामुळे सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर रांगा लागल्या होत्या.पोलादपूर तालुक्यात गेल्या २४ तासात २४५ मिमी पावसाची नोंद झाली असून नद्या, नाले, ओहळ धबधबे तुडुंब भरून वाहत आहेत. तर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यातच शुक्रवारी रात्री उशिरा ११ वाजताच्या सुमारास धामणदेवी गाव हद्दीत दरड कोसळून वाहतूक ४ तासांनंतर रात्री २ वाजता सुरळीत करण्यात कशेडी पोलिसांना यश आले मात्र सकाळी पुन्हा कशेडी घाटात पहाटे ४ वाजता पोलादपूरनजीक चोळई गाव हद्दीत दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. सकाळी ८ वाजता एकेरी वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले तरी पुन्हा दरड येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता चौपदरीकरणामुळे दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.दरड कोसळल्याचे समजताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन जेसीबीच्या साहाय्याने चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दरड हटविण्यात पोलिसांना यश आले. मात्र महामार्गावर सुमारे ५ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शाळा-कॉलेजला जाणाºया विद्यार्थ्यांचे हाल झाले. तर कशेडी विभागात जाणारे शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेत पोहोचता आले नाही.वाहतूककोंडीत अडकलेल्या ३ रुग्णवाहिकांना पोलिसांनी तातडीने वाट मोकळी करून देत मुंबईच्य दिशेने रवाना केले.कशेडी घाटात सातत्याने दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून पोलिसांना दिवसरात्र घाटात पहारा करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.रस्ता चौपदरीकरणामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.
कशेडी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 11:34 PM