दासगाव : महाड औद्योगीक वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या नांगलवाडी गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली जात असल्याने महामार्गावरील वाहनांना आणि औद्योगिक क्षेत्रात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास होत आहे. महाड एआयडीसी वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाई आणि कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाड एमआयडीसीमध्ये प्रवेश होत असलेल्या नांगलवाडी फाट्यावर मुंबई- गोवा महामार्गावर रस्त्यालगत दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांची पार्किंग केली जात असल्याने महामार्गावरील वाहने आणि एमआयडीसीमध्ये ये-जा करणाºया वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने येथील व्यावसायिकांनी आपली वाहने महामार्गालगत लावणे सुरू केले आहे. शिवाय वाहन दुरुस्तीसाठी आणली जाणारी वाहनेदेखील याच ठिकाणी थांबविली जात आहेत. यामध्ये बहुतांश अवजड वाहने ही रासायनाने भरलेली असतात. मुंबई-गोवा महामार्गावर सातत्याने वर्दळ सुरू असतानाच ही वाहने रस्त्यावर येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी येथूनच सुरुवात होते. या ठिकाणी नांगलवाडी गाव असल्याने नागरिकांचीदेखील वर्दळ सुरू असते. महामार्गालगत नडगाव आणि नांगलवाडी गावांच्या शाळा असल्याने लहान विद्यार्थीदेखील या ठिकाणी पायी चालत जात असताना या विद्यार्थ्यांनादेखील या वाहनांचा त्रास होत आहे. ही अवजड वाहने महामार्गाच्या साइडपट्टीवरच लावली जात असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितालादेखील धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी यापूर्वीदेखील अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामुळे येथील वाहतूक महामार्गापासून हटविण्याची मागणी होत आहे.
मुंबई -गोवा महामार्गावरील वाहने आणि महाड औद्योगिक क्षेत्रातील वाहने याच ठिकाणाहून ये-जा करत आहेत. एमआयडीसीमधील कामगार देखील येथूनच आपली वाहने घेऊन जातात. महाडमधून जाणाºया छोट्या रिक्षादेखील एमआयडीसीत जाताना येथूनच जात असतात. या सर्वांना या उभ्या अवजड वाहनांचा त्रास होत आहे. अवजड वाहने महामार्गावर खुशाल उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहने महामार्गापासून लांब सुरक्षित ठिकाणी उभी केली जावीत, अशी मागणी नागरिक, वाहनचालक करत आहेत.