कर्जत : शहरातील गटारे उघडी असून, या गटारांमध्ये अनेक गाई पडल्या. नागरिकांनी त्यांना बाहेर काढले, तरीही नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. संपूर्ण कर्जत शहराचे पाणी ज्या मुख्य नाल्यातून वाहते त्या नाल्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत ठेवले आहे. बाजारपेठ नगरपरिषद यांच्या बाजूने वाहणारा मुख्य नाला अभिनव ज्ञानमंदिर शाळेच्या शेजारून नदीकडे जातो. या नाल्याचे काम नथुराम हरपुडे यांच्या घरासमोर गेले कित्येक महिने बंद आहे. अभिनव शाळा, शिशुमंदिर, शारदामंदिर, कन्याशाळा, उर्दू शाळा, या शाळांमधील हजारो विद्यार्थी ज्या रस्त्याने चालत जातात, त्या रस्त्यावरील नाला ठेकेदाराने अनेक नागरिकांनी सूचना करूनदेखील बंदिस्त केला नाही.शाळेच्या वेळी या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची गर्दी होते. शाळेत जाणारी लहान बालके जीव मुठीत धरून येथून प्रवास करीत असतात. एखाद्या मुलाचा पाय घसरला किंवा त्याचे दुर्लक्ष झाले तर या सात ते आठ फूट उंच आणि सात फूट रुंद नाल्यात ती मुले पडू शकते. शहरातून वाहून येणारे पाणी याच नाल्यातून जात असल्याने त्याचा प्रवाहसुद्धा जोरात असतो. नाला उंच आणि प्रवाही असल्याने दुर्दैवाने कोणी त्यात पडले तर त्याला तत्काळ काढणे शक्य नाही.हरपुडे यांच्या घरासमोर उघडा असणारा नाला पुढे नदीपर्यंत बंदिस्त आहे. कोणी यात पडले तर तो सरळ नदीतच वाहून जाणार. ४ आॅगस्ट रोजी कर्जत शहरात पुराच्या पाण्याने थैमान घातले होते. हरपुडे यांच्या आॅफिस आणि बंगल्यात फूटभर पाणी शिरले होते. रस्त्यावरून नाल्यात पाणी वाहत असताना रस्ता आणि नाला एकरूप झाला होता. हरपुडे यांच्या घरातील सामान आणि पाणी बाहेर काढण्याकरिता त्यांचे अनेक मित्र त्यांच्या घरी आले होते. याच वेळी ज्येष्ठ नागरिक सीताराम मंडावळे यांना नाला लक्षात न आल्याने ते नाल्याच्या भिंतीपर्यंत आले असता तेथील नागरिकांनी त्यांना ओरडून मागे फिरण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब झाला असता तर मंडावळे त्या नाल्यात पडले असते आणि अनर्थ झाला असता. उल्हासनगर येथील एकच ठेकेदार कर्जतमधील सर्व रस्ते, नाले, गटारे, बिल्डिंग यांची कामे घेतो. त्याच्याकडे खूपच जास्त काम असल्याने कामाचा फार ताण आहे.कामाचे कुठलेही नियोजन नसल्याने त्यांच्या मनाला येईल तसे काम सुरू करतो. नागरिकांची किंवा जाणाऱ्या-येणाºया वाहनांची किती गैरसोय होते याच्याशी त्याला काही देणे-घेणे नसते. अभिनव शाळा, न्यायालय, नागरपरिषदेजवळील काम डिसेंबरपासून सुरू आहे. मुलांना सुट्टी असताना काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे असताना त्या काळात काम केले नाही. सर्व कार्यालयासमोरील रस्ता, नगरपरिषदे शेजारील किंवा कन्याशाळेजवळील रस्ता याचे योग्य त्या प्रकारे नियोजन झाले नाही. आता ५० फुटांचा रस्ता टप्प्याटप्याने केला जात आहे. ठेकेदाराने सर्वांची व्यवस्थित बांधणी केली असल्याने अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी या ठेकेदाराला पाठीशी घालतात असेच काहीसे चित्र आहे. किमान अंशी शाळेजवळील नाले बंदिस्त व्हावेत. लहान मुलांच्या जीवाशी खेळ होऊ नये एवढीच पालकांची विनंती आहे.
उघड्या गटारांमुळे अपघातांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 1:36 AM