माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत असून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारे वाहतूक करणाऱ्या वाहनचालक आणि वाहनधारकांवर कारवाई होणे गरजेच आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे आहे.मुंबई-गोवा मार्गावर अशा ओव्हरलोड वाहनांना कोणतीही नियमावली नसल्याने राजरोसपणे वाहनांमध्ये गरजेपेक्षा जास्त क्षमतेचा माल भरून नेला जातो. गाड्या या मार्गावरून नेताना हे वाहनचालक दुचाकी वाहनांची पर्वा करत नाहीत. अनेक वेळा भाताचा कोंडा, भाताचे तुशे, पेंडा हे वीटभट्टीसाठी नेत असताना, त्या वाहनांमधून ओव्हरलोड भरलेला भाताचा तुसा किंवा भाताचा भुसा हे सर्व रस्त्यावर पडत असते. तसेच भाताचा तुसा हा वाºयाने उडून दुचाकीस्वाराच्या डोळ्यात जातो. त्यामुळे दुचाकीचे अपघात होतात. यामुळे एखादी मोठी दुघटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.प्रत्येक मालवाहू वाहनाची मालवाहून नेण्याची क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे या वाहनांमध्ये कंपनीने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच मालाची वाहतूक करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केली जाते. या प्रकारामुळे अनेक वेळा अपघात होतात. अशा वाहनचालक तसेच गाडीमालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
ओव्हरलोड वाहतुकीमुळे महामार्गावर अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:46 AM