इरसाळगडावर दरडी कोसळण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:04 AM2018-08-11T02:04:39+5:302018-08-11T02:04:43+5:30
इरसाळगड हा खालापूर तालुक्यात येणारा किल्ला आहे. सध्या कोसळलेल्या दरडीमुळे धोकादायक बनला असून गिर्यारोहकांनी जपून वाट धरावी, अशी सूचना चौक ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.
मोहोपाडा : इरसाळगड हा खालापूर तालुक्यात येणारा किल्ला आहे. सध्या कोसळलेल्या दरडीमुळे धोकादायक बनला असून गिर्यारोहकांनी जपून वाट धरावी, अशी सूचना चौक ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाताना इरसाळगड सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. इरसाळ माचीपासून गडावर जाण्यासाठी एक वाट आहे; पण त्याच मुख्य वाटेवर दरड कोसळल्याने सुळक्यावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
गडावर ट्रेकिंगसाठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स भेट देतात. समुद्रसपाटीपासून साधारण ३७०० फूट उंच असणारा इरसाळगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. माथेरानच्या डोंगररांगेत वसलेला हा गड अनेक ट्रेकर्सला नेहमीच भुरळ घालतो. पावसाळ्यात याचे सौंदर्य अफाट असते. इरसाळ हा एक सुळका आहे. त्यामुळे इतिहासात त्याचा कुठे उल्लेख नाही. गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अस्तित्त्व पाहता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी रायरीपर्यंतचा सारा मुलूख घेतला, तेव्हा हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आल्याचे बोलले जाते. इरसाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. गडावर विशाळा देवीची मूर्ती पाहायला मिळते. गडावर पाण्याचे एक टाक लागते व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे.
सुळक्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो; परंतु काही दिवसांपूर्वी येथील सुळक्याचा मोठा भाग कोसळला आहे. त्यामुळे आता सुळक्यावर जाण्यासाठी असलेली वाटच बंद झाल्याचे ट्रेकर्स सांगतात.