दाभोळमध्ये दरडीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:36 AM2017-08-08T06:36:27+5:302017-08-08T06:36:30+5:30

महाड तालुक्यातील सावित्री खाडीच्या किनारी वसलेल्या दाभोळ गावातील मोहल्ला आणि बौद्धवाडी सध्या दरडीच्या छायेत आहेत. या दोन वस्त्यांच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरात जमिनीला तडे गेले आहेत.

 Risk of Dandruff in Dabhol | दाभोळमध्ये दरडीचा धोका

दाभोळमध्ये दरडीचा धोका

googlenewsNext

सिकंदर अनवारे  
दासगाव : महाड तालुक्यातील सावित्री खाडीच्या किनारी वसलेल्या दाभोळ गावातील मोहल्ला आणि बौद्धवाडी सध्या दरडीच्या छायेत आहेत. या दोन वस्त्यांच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरात जमिनीला तडे गेले आहेत. २००५ पासून सातत्याने या तड्यांच्या आकारात बदल होत असल्याने धोका वाढत असल्याची घंटा निसर्गाने वाजवली आहे. मागील आठवड्यात दाभोळ मोहल्ला येथील पावसामध्ये एक वाडा कोसळला असून दोन घरांना तडे गेले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यांत्रिक पद्धतीने खाडीत सुरू असलेल्या वाळू उत्खननामुळे हा धोका वाढत असल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून केला जात आहे.
जुलै २००५ महाडमध्ये जे अस्मानी संकट कोसळले, त्या दरडीचा धोका दाभोळ गावाला देखील २००५ मध्येच दिसून आला. टोळ-आंबेत रस्त्यावर दाभोळ मोहल्ला येथील एसटी स्टँडजवळील रस्त्याशेजारी डोंगराळ जमिनीला त्यावेळी जवळपास ६० ते ७० फूट खोल तडा गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी प्रशासनामार्फत या भेगाळलेल्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले. मोहल्ला आणि बौद्धवाडीला भेगाळलेल्या जमिनीमुळे दरडीचा धोका संभवतो, असा अहवाल त्या वेळेस भूगर्भ शास्त्रज्ञाने दिला होता. ज्या गावांमध्ये दरडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अगर दरड कोसळली अशा गावांचा महाडच्या महसूल विभागाला दाभोळ या संभाव्य दरडग्रस्त गावांचा विसर पडला.
दाभोळ मोहल्ला आणि बौद्धवाडीच्या वरील बाजूस डोंगराळ जमिनीला हा पडलेल्या तडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामध्ये दाभोळमध्ये नूरजहा हमीद माटवणकर यांचा वाडा अचानक कोसळला तर ज्या ठिकाणी २००५ मध्ये रस्त्यालगत अर्धा किमी जमिनीला तडा गेला आहे. त्याच्या जवळच असलेल्या अ. समद चिपळूणकर आणि इरफान चिपळूणकर या दोन रहिवाशांच्या एकाच्या घरालगत असलेली गॅलरी अचानक कोसळली तर दुसºयांच्या घरालगत असलेल्या बाथरुमला तडे गेले.
घटना समजताच महाडच्या महसूल विभागाने घटनास्थळी भेट देवून पाहणी आणि पंचनामे केले आहेत. दुर्घटनेनंतरच्या या सोपस्कारापेक्षा दुर्घटना घडण्याआधी दखल घेणे गरजेचे आहे. २००५ पासून टप्प्याटप्प्याने वाढत चाललेल्या हा तडा भविष्यात दाभोळ मोहल्ला व बौद्धवाडीच्या ३० ते ४० घरांना धोकादायक ठरू शकतो.

खाडीतील जुटे बेपत्ता होत आहेत
दाभोळमध्ये सुरू असलेल्या या दरडीच्या भयनाट्यासोबत खाडीमध्ये असलेली छोटी छोटी बेटं म्हणजेच जुटे हळूहळू बेपत्ता होताना दिसत आहेत. सावित्री खाडीच्या जोरदार प्रवाहामध्ये बेटं शेकडो वर्षांपासून टिकून होती. थोडीफार मातीची धूप वगळता या बेटांच्या अस्तित्वाचा प्रश्न कधीच निर्माण झाला नव्हता.
सावित्री खाडीचे पात्र मोकळे करण्यासाठी बेट काढण्याचा प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या यांत्रिक पद्धतीचे वाळू उत्खनन या बेटांच्या अस्तित्वावर आले आहे. या छोट्या बेटांच्या किनाºयावरील माती झाड खाडीच्या पात्रात ढासळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दाभोळ ग्रामस्थांच्या आरोपाला दुजोरा मिळत असून याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर खाडी किनाºयाच्या रहिवाशी वस्तीला धोका पोचण्याची भीती वाढली आहे.

दरड हा निसर्गाचा प्रकोप असला तरी या दरडीचे काही कारण मानवनिर्मित असतात. तशाच प्रकारे दाभोळ मोहल्ल्याच्या खालील बाजूस असलेल्या सावित्री खाडीत होणारे यांत्रिक पद्धतीने वाळू उत्खनन या भेगाळणाºया जमिनीला कारणीभूत असल्याचा आरोप या विभागातील ग्रामस्थ करीत आहेत. दुर्घटना घडण्यापूर्वी मोहल्ला आणि बौद्धवाडी सुरक्षित करा, अशी मागणी देखील दाभोळ ग्रामस्थांकडून केली जात आहे.

माटवणकर यांचा पावसामध्ये वाडा कोसळला होता त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे. तडा गेलेल्या ठिकाणची व घरांची पाहणी नायब तहसीलदार प्रदीप कुडाळ व दासगाव तलाठी संदेश पानसारे यांनी केली असून या ठिकाणी पुढे धोका निर्माण होवू शकतो. या विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- उमेश भोरे, तलाठी दाभोळ

Web Title:  Risk of Dandruff in Dabhol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.