कर्जत रेल्वे स्थानकात पुलाखालील गॅपचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:51 PM2019-11-18T23:51:04+5:302019-11-18T23:51:09+5:30

प्रवासी जखमी होण्याचे प्रकार वाढले : गाडी पकडण्याच्या नादात होत आहेत अपघात

The risk of gaps under the bridge at Karjat railway station | कर्जत रेल्वे स्थानकात पुलाखालील गॅपचा धोका

कर्जत रेल्वे स्थानकात पुलाखालील गॅपचा धोका

Next

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पूल उभारला आहे. त्या पादचारी पुलाच्या खालील भाग मागील काही महिन्यांपासून धोकादायक बनला आहे. कारण त्या मोकळ्या जागेत असलेले लोखंडी खांब यांना धडकून अपघात होऊ शकतात. याबाबत मनसेचे कर्जत शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आक्षेप घेतला असून, त्या धोकादायक जागेबाबत योग्य निर्णय घेऊन दुर्घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन आणि ईएमयू स्थानकात मुंबई दिशेकडे बांधलेल्या पादचारी पुलाची निर्मिती प्रवाशांच्या सोयीसाठी केली आहे. पादचारी पुलाचे काम सुरू असतानाच कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने पादचारी पुलाची उतरण्याची दिशा लोकल ज्या दिशेला लागते, त्याच दिशेला करण्याची मागणी केली होती. प्रसंगी आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता, परंतु आपल्या चुकीच्या निर्णयावर ठाम असलेल्या रेल्वे प्रशासनाने असोसिएशनच्या मागणीला दाद दिली नाही. पादचारी पुलाची उतरण्याची दिशा लोकलच्या विरुद्ध दिशेलाच केली. परिणामी, रेल्वे प्रवाशांना पादचारी पुलावरून उतरून लोकल पकडण्यासाठी उलटे सुलटे उतरून धावपळ करत लोकल पकडावी लागते.

सदर पादचारी पुलाच्या खाली ईएमयू स्थानक व पादचारी पुलाचे लोखंडी खांबमध्ये मोठी मोकळी जागा (गॅप) असल्यामुळे लोकल सुटता सुटता घाईगडबडीत प्रवाशांना पादचारी पुलाखाली फलाट नसल्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक प्रवासी लोकल पकडताना पादचारी पुलाखालील मोकळ्या जागेत (गॅपमध्ये) पडून जखमी झाले आहेत.

अशीच एक घटना बदलापूर येथील प्रवासी पादचारी पुलावरून गाडी पकडत असताना घडली व तो प्रवासी लोकल पकडण्याच्या गडबडीत फलाटाच्या खाली पडला. त्यावेळी फलाटावर असलेल्या इतर प्रवाशांनी काहीही हालचाल न करता पडलेल्या अवस्थेत राहण्यासाठी त्याला जोरजोराने आवाज दिला. नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला, परंतु त्याच्या हाता-पायांना आणि संपूर्ण अंगावर खूप जखमा झाल्या. त्यामुळे कर्जत रेल्वे प्रशासनाने पूल आणि फलाटावरील गॅप कमी करावी, त्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: The risk of gaps under the bridge at Karjat railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.