वाढत्या स्वाइन फ्लूचा धोका

By Admin | Published: August 18, 2015 02:56 AM2015-08-18T02:56:34+5:302015-08-18T02:56:34+5:30

शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सहावरून आठवर पोहचली आहे. तसेच संशयित रुग्णांची संख्या देखील २१ झाली आहे. या अनुषंगाने पनवेल

The risk of increasing swine flu | वाढत्या स्वाइन फ्लूचा धोका

वाढत्या स्वाइन फ्लूचा धोका

googlenewsNext

वैभव गायकर, पनवेल
शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सहावरून आठवर पोहचली आहे. तसेच संशयित रुग्णांची संख्या देखील २१ झाली आहे. या अनुषंगाने पनवेल नगरपरिषद सतर्क झाली असून शहरातील डुक्कर मालकांना नोटिसा बजावून डुकरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वाइन फ्लू हा संसर्गित डुकरापासून एच१एन१ या विषाणूपासून पसरतो. खोकला येणे, गळ्यामध्ये खवखव, ताप येणे, डोकेदुखी, नाकातून पाणी गळती आदी या आजाराची लक्षणे आहेत. पनवेल शहरामध्ये स्वाइन फ्लूचे एकूण चार रुग्ण आहेत. यापैकी चारही रुग्ण ठाणा नाका परिसरातील आहेत. या परिसरात डुकरांचा वावर सर्वात जास्त आहे. वातावरणातील बदल या आजाराला पूरक असल्यामुळे नगरपरिषदेने शहरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात डुकरांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या १२ मालकांना नोटिसा बजावून शहरातील डुकरांना ४८ तासांच्या आत हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात वाल्मीकी नगर, इंदिरा नगर, लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी आदी परिसरात डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. शहरात ही संख्या १०० च्या वर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नगरपरिषदेकडे शहरातील डुकरांचा अधिकृत आकडा उपलब्ध नसला तरी शहरातील सर्वच डुकरांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. पनवेल नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक डॉॅ. दिलीप कदम म्हणाले की, नगरपरिषदेच्या वतीने स्वाइन फ्लूच्या निवारणासाठी तत्काळ पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी शहरात जनजागृतीपर फलक लावले आहेत, तसेच शहरात दवंडी देखील बजावण्यात आली आहे. स्वाइन फ्लूच्या निवारणासाठी सतर्कता म्हणून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात एकूण १३ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. जंतुनाशक फवारणी, धुरीक रण फवारणी आदी जबाबदारी या पथकाची राहणार आहे. तसेच नियमित १० जणांचे पथक देखील यासाठी कार्यरत असणार आहे.
स्वाइन फ्लूच्या निवारणासाठी एमजीएम रुग्णालय, कामोठे याठिकाणी २० खाटांचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी एच१एन१ संशयित रुग्ण व लागण झालेल्या रुग्णांवर देखरेख ठेवली जाणार असून त्यांच्यावर स्वाइन फ्लू निवारणासाठी औषधोपचार केले जाणार आहे, अशी माहिती पनवेलमधील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एस.लोहारे यांनी दिली. याठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास अधिक माहितीसाठी ग्रामीण रुग्णालय, पनवेल याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .

Web Title: The risk of increasing swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.