लहरी हवामानामुळे भातशेतीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:20 PM2019-09-25T23:20:03+5:302019-09-25T23:20:08+5:30
कृषी विभाग सतर्क; रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
- गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यासह जिल्ह्यात मंगळवार २४ सप्टेंबरपासून अचानक सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगडवासीयांची तारांबळ उडाली. यामुळे भातपिकाला नुकसानीचा तडाखा बसत आहे.
यावर्षी जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील भातशेती चांगल्या स्थितीत आहे. यामुळे उत्पन्न चांगले मिळेल म्हणून शेतकरी खूश होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्यात भातशेतीची दाणादाण उडाली आहे. पुढील पंधरवड्यात तयार होणारी भातशेती कापणीयोग्य असताना विजांच्या कडकडाटासह जोरदार पडणाऱ्या पावसामुळे उभे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सप्टेंबर महिना अर्धाअधिक संपत आला तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. दिवसभरात व सायंकाळच्या सुमारास वर्दी देणारा परतीचा पाऊस सतत पडत असल्याने भातपिकाला नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव तसेच महाड तालुक्यातील चांगल्या भातशेतीला परतीच्या पावसाने धोका निर्माण केला आहे. समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबी वर आली आहे. अनेक ठिकाणी शेती कापण्यायोग्य झाली आहे. अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने पिकलेली भातशेती आडवी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसºया बाजूला वन्यप्राण्यांकडून अशा शेतीचे नुकसान केले जात आहे. वानर, डुक्कर शेतीमध्ये घुसून नुकसान करत आहेत. त्यामुळे बळीराजा धास्तावला होताच. त्या जोडीला परतीच्या पावसाने काही ठिकाणची भातशेती धोक्यात आली आहे.
यावर्षी जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील भातशेती चांगल्या स्थितीत आहे. यामुळे उत्पन्न चांगले मिळेल. सध्या समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबीवर आली आहे. भाताबरोबर असलेले बाजूचे गवत काढण्याचे (बेरणी) काम सुरू आहे. पुढील पंधरवड्यानंतरही भातशेती कापणीयोग्य होईल. मात्र, सध्या पडणाºया पावसाचा जोर कायम राहिल्यास आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.
- चंद्रकांत धुमाळ, मेंदडी कोंड, म्हसळा
लहरी हवामानामुळे भातशेतीवर रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच शेतकºयांना फवारणी करण्याची सूचना देतो. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी तशी माहिती अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे.
- शिवाजी भांडवलकर, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन