परतीच्या पावसाचा भात पिकाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 02:21 AM2019-10-10T02:21:59+5:302019-10-10T02:22:22+5:30
पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत.
पेण : जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस व आॅक्टोबर हिटचे कडक ऊन, त्यामध्ये दिवसा ऊन; सायंकाळी पाऊस, असा दररोजचा पावसाचा खेळ सुरू असतो. कधी मेघगर्जनासह विजांच्या कडकडाटानंतर येणारा हस्त नक्षत्राचा पाऊस जाईपर्यंत शेतकरी तयार झालेले पीक कापणीसाठी सुरुवात करणार नाहीत. हातातोंडाशी आलेले भातपीक सोसाट्याचे वारे व पडणाऱ्या पावसामुळे जमीनदोस्त होत आहे. यामुळे शेतकºयाची चिंता वाढली असून नुकसानीची शक्यता वर्तविली जात आहे.
परिपक्व झालेले भातपीक पाण्यात पडल्यास त्यातील तांदूळ खराब होतो व कणसांना अंकुर फुटतो, यामुळे या लहरी पावसाची कायम धास्ती शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे. पेण तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र १२ हजार ८०० हेक्टर असून, वरच्या भागातील हळवी पिके परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झालेली आहेत. आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे पश्चिमेकडील भात लागवड क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकांची जमवा जमव करीत भातशेती लागवड केली होती. मात्र, या भागातील भाताचे उत्पादन निम्याने घटले आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य लागते. यासाठी जे पदरात पडेल ते घ्यावे, अशी शेतकºयाची भावना आहे.
जुलैपासून लागलेला पाऊस धुवाधार पडल्याने गतवर्षी पडलेल्या सरासरी पावसापेक्षा अडीचपट जास्त सरासरी पाऊस यावर्षी पेणमध्ये झाला. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत दोन वेळा पूर येऊन प्रचंड आर्थिक नुकसान झाले. आता आॅक्टोबर उजाडला तरीही पाऊस जाण्याची चिन्ह दिसत नाहीत. कधी एकदाचा पाऊस परतीच्या मार्गावर जातोय, या प्रतीक्षेत शेतकरी असून पडणारा पाऊस परिपक्व तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान करत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने पुन्हा एकदा शिवारातील भातशेतीत पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे शेतकºयाला नुकसान होईल, अशी चिंता वाटत आहे.