नेरळ-कळंब रस्त्यावरील वीजखांब धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:51 PM2018-10-25T23:51:25+5:302018-10-25T23:51:28+5:30
नेरळ-कळंब रस्त्यावर पोशीर येथे एका खासगी गृहप्रकल्पाला वीज पुरविण्यासाठी महावितरणने विजेचे खांब उभारले आहेत.
- कांता हाबळे
नेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावर पोशीर येथे एका खासगी गृहप्रकल्पाला वीज पुरविण्यासाठी महावितरणने विजेचे खांब उभारले आहेत. मात्र, हे खांब वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून, लवकरात लवकर तेथून हटवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक रहिवासी व प्रवासी यांनी केली आहे.
काही दिवसांपासून नेरळ-कळंब मार्गावर विद्युत खांब टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम नक्की कोण करीत आहे, याबाबत स्थानिक रहिवाशांना काहीच कल्पना नाही. सदर विद्युत खांब रस्त्याला लागूनच साइडपट्टीवरच उभारण्यात येत असल्याने ग्रामस्थ, प्रवासी तसेच वाहनचालक यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच सदर काम हे येथील एका खासगी व्यावसायिक प्रकल्पाला विद्युतपुरवठा करण्याच्या उद्देशाने करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. एका खासगी कंपनीच्या सोयीकरिता महावितरण प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत असल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने सदर काम हाती घेतले असून, वारे सबस्टेशन प्रमाणेच वरई व वांगणी येथे महावितरणचे सबस्टेशन होत असल्याने त्याकरिता ही लाइन टाकली जात आहे, अशी माहिती महावितरणच्या कर्जत कार्यालयाकडून मिळाली. मात्र, कोणतीही मंजुरी नसताना बांधकाम विभाग आणि महावितरण यांनी एका गृहप्रकल्पाचे लाड पुरविण्याठी हा घाट घातला आहे व ते आमचे ग्राहक होणार असल्याने आम्ही हे करत असल्याचे कर्जत महावितरणचे अधिकारी यांनी सांगितले. तर या सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता अधिकारी उपस्थित नव्हते.
एरवी रस्त्यावर अतिक्र मण होऊ नये म्हणून लगेच कारवाईचा बडगा उगारणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आता गप्प का? असा प्रश्न स्थानिक रहिवासी यांनी केला आहे. त्यामुळे हे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी पोशीर ग्रामस्थांनी कर्जत महाविरणकडे केली आहे, अन्यथा यासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
>भूसंपादनाआधीच रस्त्याचे काम सुरू
ग्रामस्थ प्रवीण शिंगटे, कृष्णा हाबळे, रवींद्र बोटुंगळे, संजय राणे, काळूराम यांनी या बाबत महावितरणचे कर्जत येथील उपअभियंता आनंद घुले यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली. प्रकल्पास सर्व मंजुरी आदेश मिळालेले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ज्या रस्त्यालगत हे काम सुरू आहे तो रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील असून, आपण सदर भूसंपादन करण्यासाठी त्यांची परवानगी मिळवली का? या प्रश्नावर आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, लवकरच परवानगी मिळेल, असे उत्तर मिळाले. परवानगी मिळाली नसतानाही हे काम सुरू कसे केले, असा जाब ग्रामस्थांनी विचारला.
>वारे येथून वरई एक्झर्बिया प्रोजेक्टसाठी ही लाइन टाकण्यात येत आहे. ते आमचे ग्राहक होणार आहेत, साइडपट्टी सोडून तीन फुटांवर हे पोल उभारण्यास बांधकाम विभागाकडे मंजुरी प्रस्ताव पाठवलेला आहे. या संदर्भात मंजुरी आली की नाही, हे लवकरच कळविले जाईल, तसेच रस्त्यावर हे पोल आले असल्यास हटविले जातील.
- आनंद घुले, उप अभियंता, महावितरण कर्जत
>पोशीर ते वरई गावापर्यंत महावितरणने एका खासगी गृहप्रकल्पाला वीज देण्यासाठी रस्त्याच्या कडेला काही अंतरावर विजेचे पोल उभारले आहेत. एका खासगी गृहप्रकल्पाचे लाड पुरवून सदर विद्युत खांब रस्त्यालगत साइडपट्टीवरच टाकले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवासी यांच्यासाठी जीवघेणे ठरणार आहेत. महावितरणने ते काढून टाकावेत व दोषींवर कादेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल.
- प्रवीण शिंगटे, ग्रामस्थ,
पोशीर