रायगडात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; वाहतूक ठप्प, शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर
By राजेश भोस्तेकर | Published: July 19, 2023 09:48 AM2023-07-19T09:48:37+5:302023-07-19T09:49:05+5:30
पाली अंबा नदी पुलावरून पाणी, विद्यार्थी, कामगार प्रवाशी अडकले, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
अलिबाग : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्यात वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता वर्तवलीय आहे. रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाली खोपोली राज्यमहामार्गावरील पाली अंबा नदी पुलावरील जुन्या पुलावरून वेगवान प्रवाहात पाणी जात आहे.
नवीन पुलाला देखील चहूबाजुनी पाण्याने वेढा दिला आहे. पर्यायी भेरव सुधागड पुलावरून देखील पाणी गेलंय. त्यामुळे विद्यार्थी, कामगार प्रवाशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अडकून पडले आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आलीय. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीने धोका पातळी गाठली असून सर्व शासकीय यंत्रणा सज्ज आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असून सध्यस्थितीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रीस, वाशीवली भागामध्ये पाणी साचले आहे. खोपोली श्रीरामनगर , लव्हेज येथे पाणी साचले आहे. कोणतीही अनुचित घटना अथवा जीवितहानी नाही. नागरिकांना आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.