विशेष प्रतिनिधीअलिबाग : गेल्या सोमवारपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असतानाच, मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदीकिनारच्या १९ तर अंबा नदीकिनारच्या नऊ गावांना पुरापत्तीचा धोका निर्माण झाला. या सर्व गावांमध्ये धोक्याचा इशारा देऊन ग्रामस्थांना जागरूक करण्यात आले असून, आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.महाबळेश्वर येथे सोमवारी रात्री झालेला पाऊस आणि पोलादपूर व महाड तालुक्यात सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे सावित्री नदीच्या जलपातळीत देखील झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, सावित्री नदीकिनारच्या ४३ गावांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुंडलिका नदीची पूर धोका जलपातळी २३.९५ मीटर आहे व सद्यस्थितीत जलपातळी डोलवहाळ येथे २३.४० मीटर झाली, तर अंबा नदीची पूर धोका जलपातळी नागोठणे येथे ९ मीटर आहे, तर सद्यस्थितीत ही पातळी ८.२० मीटर झाली आहे. कोणत्याही क्षणी या दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी किनारच्या गावांमध्ये घुसू शकत असल्याने, नदीकिनारची गावे, वस्त्या व वाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी, आपत्ती निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, असा संदेश रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयातील पूर नियंत्रण अधिकाºयांनी रायगड जिल्हा प्रशासनास पाठवून कळविला आहे.मंगळवारी अष्टमी असल्याने सकाळी ६ वाजता समुद्राला भरती होती, त्यामुळे नद्यांचे पाणी समुद्राकडे अपेक्षित वेगाने जाऊ शकले नाही. दिवसभर जिल्ह्यात पाऊस कोसळतच असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. संध्याकाळी ६ वाजता पुन्हा समुद्रास भरती असल्याने नद्यांचे पाणी समुद्रात पोहोचून पूरपातळी खाली येण्यास विलंब लागणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांना अधिक सतर्क करण्यात आले आहे.महाड तालुक्यातवाडा कोसळलामहाड : गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी महाड तालुक्यातील कोळोसे येथे शेतघरावरील वाडा कोसळला. सुभाष खांबे यांच्या मालकीचा हा वाडा असून, वाड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा वाडा कोसळला. मात्र, या वाड्यातील गुरांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.भिरा धरणाचेतीन दरवाजे उघडलेरायगड जिल्ह्यातील भिरा धरण क्षेत्रात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत १८४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, धरणातील जलपातळी नियंत्रणात राखण्याकरिता धरणाच्या तीन दरवाजांपैकी क्र .१ व ३ असे दोन दरवाजे ०.२५ से.मी. उघडण्यात आले आहेत. परिणामी, आतापर्यंत ६२.४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाला असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. भिरा धरण क्षेत्रांत १ जून २०१७पासून एकूण ४४५४.२० मि.मी. पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी धरणातील जलपातळी ९५.१२ झाली आहे.वळवण धरणओव्हर फ्लोलोणावळा येथील टाटा पॉवरकंपनीच्या वळवण धरणाची जलपातळी ६३३.७८ मीटर झाली असून, तलाव कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होऊ शकतो. परिणामी, धरणाच्या खालील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, असा संदेश रायगड जिल्ह्यातील भिवपुरी व खोपोली हायड्रो पॉवर स्टेशनचे प्रमुख मेंडगुडले धनप्पा डी. यांनी पुणे जिल्हा प्रशासनास मंगळवारी सकाळी पाठविला आहे. धरण आॅव्हर फ्लो होऊन आपत्कालीन परिस्थिती झाल्यास अग्निशमन दल आणि डायव्हर्स(पाणबुडे) तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती लोणावळा येथील आयएनएस-शिवाजीच्या कमांडिंग आॅफिसरना टाटा पॉवर कंपनीने केली आहे. या व्यतिरिक्त पुणे पूरनियंत्रण कक्ष, मावळ तहसीलदार, लोणावळा नगरपरिषद, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा पोलीस निरीक्षक आणि धरण परिसरातील वरसोली ग्रामपंचायत यांना देखील या संभाव्य धोकादायक परिस्थितीची कल्पना टाटा पॉवर कंपनीने दिली आहे.मुरूड तालुक्यात २३० मि.मी. पाऊसआगरदांडा : मुरूड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून २३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ऐन गणेशोत्सवात सर्व गणेशभक्तांची तारांबळ उडालेली दिसून येत आहे. तसेच त्यामुळे पूर्णत: बाजारपेठही ठप्प झालेली दिसून आली. वातावरणात गारवा निर्माण झाला असून, मुरूडला पाणीपुरवठा करणाºया आंबोली व गारंबी धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. तसेच सवतखडा, नागशेत ही धरणे वाहू लागली आहेत. मुरूड शहराजवळील गोलबंगल्याजवळ दोन फूट पाणी साचल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.पेणमध्ये २४ तासांत २६० मि.मी. पाऊसजिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच असून, मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक विक्र मी अशा २६० मि.मी. पावसाची नोंद पेण येथे झाली आहे. २१३ मि.मी. पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. अलिबाग येथे १५५, मुरु ड १२७, पनवेल १२४, उरण १७१, माणगाव १०७, तळा १५५, महाड ११३.५०, पोलादपूर १२३, श्रीवर्धन १००, माथेरान १३८, कर्जत ७५.८०, खालापूर ७८, रोहा १४२, पाली-सुधागड ८४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान या २४ तासांत १३५.४२ मि.मी. होते.रामराज नदी पूल पाण्याखालीअलिबाग-रोहा राज्यमार्गावरून रामराज गावात जाणाºया रस्त्यावर रामराज नदीच्या पुराचे पाणी आल्याने रामराज गावाचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे. सोमवारी रात्री रामराज जवळच्याच भिलजी गावातील कृष्णा अनंत झावरे यांचे जुने घर पावसामुळे कोसळून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जुने घर पडले त्या वेळी घरात कोणीही नव्हते. परिणामी, कोणालाही दुखापत झालेली नाही. नांगरवाडी रस्त्यावर झाड कोसळल्याने नांगरवाडी-भोनंग रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.पावसामुळे बाजारपेठ थंडावलीतळा : मंगळवारी २४ तासांत तळा शहरात १५५ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद तहसील कार्यालयात झालेली आहे. या जोरदार पडणाºया पावसामुळे बाजारपेठ थंडावलेली दिसते. या पावसामुळे शहरात जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी शहरात क चºयाचेही ढीग पाहावयास मिळत आहेत. गटारे तुडुंब भरून रस्त्यावरून पाणी जात आहे. या जोरदार पावसाचा फटका व्यापारीवर्गाला निश्चितपणे बसणार. तसेच गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यावरही संकट आलेले आहे. नातेवाइकांकडे, मित्र परिवार, शेजारी-पाजारी यांच्याकडे श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जाणारे लोक फार कमी प्रमाणात दिसत आहेत.घर कोसळलेअलिबाग: तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साठले आहे. यामुळे गैराईचा सण असून ही बाजारपेठेत शुकशुकाट होता. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे अनेकांनी घराबाहेर न पडणेच पसंतके ले.पावसामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने कामावर गेलेल्या कामगारांचे मोठे हाल झाले. तर रामराज जवळच्या भिलजी गावांत कृष्णा अनंत झावरे यांचे अतिवृष्टीने घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या जिवितहानी झाली ेनसली तरी घराची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी झावरे यांनी के ली आहे.पेणमध्ये जनजीवन विस्कळीतलोकमत न्यूज नेटवर्कवडखळ : पेण तालुक्यात संततधार पाऊस पडत असून, नदी-नालेतुडुंब भरून वाहत आहेत. शेती पाण्याखाली गेली असल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. शेतीच्या बांधांना खांडी (चीर पडणे) गेल्याने पुराचे पाणी शेतात घुसले आहे. पेण तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पडणाºया या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.पेण शहरात विठ्ठलआळी, बाजारपेठ, उत्कर्षनगर, कोंबडपाडा, आरटीओ कार्यालय परिसर चावडीनाका, चिंचपाडा, विक्र मस्टॅण्ड पेण बसस्थानक व इतरठिकाणी पाणी साचत असल्याने, नागरिकांचे व प्रवाशांचे फारहाल झाले.तसेच भाजी-फळ विक्रेते, कुटीर व्यावसायिक, छोटे व्यावसायिक यांना या पावसाचा फटका बसला. मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून, खड्ड्यांतून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.मुसळधार पावसामुळे तालुक्यातील भोगावती, बाळगंगा अंबा, निगडी या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे दुरशेत व खरोशी गावांकडे जाण्याचा संपर्क तुटला आहे.पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याशिवाय अंतोरा, दादर, उर्णोली, सोनखार खाडी या तुडुंब भरून वाहत आहेत. तर गडब, वडखळ परिसरातील गावांमध्येही पुराचे पाणी शिरले आहे.पाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता, तालुका प्रशासनाकडून नदी व खाडीकिनारी असणाºया गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर या पावसामुळे काही भागांतील भातशेती पाण्याखाली आली आहे. तर काही गावांतील घरामध्येही पाणी शिरले आहे.येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून, प्रशासन सतर्क असल्याचे सांगण्यात आले. या पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दूरध्वनी व इंटरनेट सेवा खंडित असल्याने नागरिकांना संपर्क करणे कठीण झाले आहे. तर एसटी व रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे.
नद्यांनी धोकादायक जलपातळी ओलांडली , ‘कुंडलिका’ काठच्या १९ गावांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:44 AM