रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 04:09 AM2018-07-08T04:09:30+5:302018-07-08T04:09:52+5:30
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली.
अलिबाग - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी महाड येथे ४८ मि.मी. तर पोलादपूर येथे ८५मि.मी. तर महाबळेश्वर येथे झालेल्या २०१ मि.मी. पावसाने सावित्री नदीला पूर आला.
दरम्यान, येत्या २४ तासांत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शनिवारी सायंकाळनंतर भरती असल्याने तोपर्यंत पुराचे पाणी न ओसरल्यास महाडमधील परिस्थिती चिंताजनक होऊ शकत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि आपत्ती निवारण यंत्रणा जिल्ह्यात हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. संभाव्य भूस्खलनग्रस्त गावांत गरज भासल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील, तसेच दरडग्रस्त व नदी किनाऱ्यावरील गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने जिल्ह्यात सर्व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याचे कळविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबणे, माती खचणे आदी घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत बचाव पथक, बचाव साहित्य, रु ग्णवाहिका, रुग्णालये आदी सुविधा तत्पर व सतर्क ठेवा. जुन्या व धोकादायक पुलांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. पुलांवरून पाणी वाहत असल्यास रहदारी पूर्णपणे थांबवावी. सखल भागातून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करावे, वादळामुळे झाड पडल्यास रहदारी सुरळीत होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात आदी सूचना नियंत्रण कक्षाला दिल्या आहेत.
जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री नद्यांच्या खोºयात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.