सुधागडमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:00 AM2017-07-19T03:00:32+5:302017-07-19T03:00:32+5:30
गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्यात धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यात सुधागडात मुसळधार पावसाने तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्यात धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यात सुधागडात मुसळधार पावसाने तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर सतत तीन वेळा अंबा नदीवरील पाली, भेरव, जांभूळपाडा पुलावरून पाणी गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वाकण, पाली, खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
पाली-भिरा मार्गावरील सरस्वती नदीने नांदगाव येथील पूल सहा तास पाण्याखाली गेला होता त्यामुळे नांदगाव पंचक्र ोशीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी एकच पूल असल्याने विभागातील ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. तसेच मानखोरे विभागातील भेलीव तर सिध्देश्वर भार्जे येथील वलका नदी सुध्दा पूरमय झाली होती. तसेच पाली बसस्थानकाला तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या बसेसने इतरत्र थांबा घेतला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. महामंडळाने पाली बसस्थानक परिसरात बांधलेले कंपाऊंड वॉल पूर्णपणे बंदिस्त केल्याने पाणी जाण्यासाठी गटार लाइन न ठेवल्याने अतिवृष्टी झाल्यास पालीचे बसस्थानक तुडुंब भरते, त्यामुळे येथील पाणी जाण्यास उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सोमवारी सुधागडमध्ये पूरस्थिती होती ती आजही पाऊस न थांबल्याने जैसे थे होती. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी भात, नाचणी, वरी लावणीची ही कामे सध्या थांबली आहेत. हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.