अलिबाग मेडिकल कॉलेजचा मार्ग झाला मोकळा; सरकारने दिली अटी, शर्तींवर परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 01:02 AM2020-10-15T01:02:25+5:302020-10-15T01:02:40+5:30
जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत वापरता येणार; अडथळा दूर
आविष्कार देसाई
रायगड : अलिबाग तालुक्यातील खानाव परिसरामध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यातील अडथळा दूर झाला आहे. येथील सरकारी रुग्णालयाच्या इमारतींसह खाटांचा वापर आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वापरण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
सरकारने मान्यता देताना काही प्रमुख अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होण्याला आळा बसणार आहे. शिवाय जिल्हा सरकारी रुग्णालय प्रशासनाच्या अस्तित्वावर थेट गदा येणार नाही याची तजवीज सरकारने केली असल्याचे सरकारी आदेशात नमूद केल्याचे दिसून येते. तत्कालीन अर्थमंत्री तथा विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी मेडिकल कॉलेजची मुहूर्तमेढ रोवली होती. आता त्यांचीच मुलगी जिल्ह्याची पालकमंत्री होऊन ते स्वप्न पूर्णत्वास नेत असल्याचे अधोरेखित होते.
रायगड जिल्हा मुंबईला अगदी खेटून असणारा जिल्हा आहे. मात्र, जिल्ह्याची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. आरोग्य, शिक्षण अशा महत्त्वाच्या घटकांसाठी आजही जिल्ह्याला बहुतांश करून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
जिल्ह्यात आरोग्य सुविधांची वाणवा आहे. अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालय असले तरी, सोयीसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळत नाही.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या रुग्णालयांतील रुग्ण खाटांचा वापर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील अलिबाग येथे नियोजित नवीन मेडिकल कॉलेजसाठी वापर करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
पालकमंत्री अदिती तटकरे यांचा पुढाकार
रायगड जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारल्यास आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार असल्याने तत्कालीन अर्थमंत्री तथा विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी प्रयत्न केले होेते. कालांतराने ते मागे पडले होते. त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेत त्याला बळ दिले आहे. आता पुन्हा मेडिकल कॉलेज जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टिपथात आले आहे.
डॉ. गिरीश ठाकूर यांची अधिष्ठाता म्हणून निुयक्ती
अलिबाग नवीन सरकारी मेडिकल कॉलेजसाठी व संलग्नित रुग्णालय स्थापनेबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेची मोजणी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. सरकारने मेडिकल कॉलेजसाठी डॉ. गिरीश ठाकूर यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्तीही केली आहे.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत त्याचप्रमाणे अन्य बाबी वापरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे अलिबागमध्ये मेडिकल कॉलेज उभे करण्यातील मार्ग सुकर झाला आहे. मेडिकल कॉलेजच्या कामाला अधिक गती देऊन रायगडवासीयांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल. - अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड
अर्थमंत्री असताना अलिबागमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याचा प्रयत्न केला होता. आता ते कार्य माझ्या मुलीच्या हातून पूर्णत्वास जात आहे याचा आनंदच आहे. रायगडवासीयांसाठी ते लवकर उभारता यावे यासाठी दिल्लीत आवश्यक लागणाऱ्या परवानगीसाठी माझा प्राधान्यक्रम असेल. - खासदार सुनील तटकरे, रायगड