बिरवाडी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये घातपाताची शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. महाड - पुणे राज्यमार्ग तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर नाकाबंदी कायम करण्यात आली आहे.शनिवार (१५ आॅगस्ट) व रविवार (१६ आॅगस्ट) सलग सुट्या येत असल्याने या दिवसांमध्ये मुंबई, पुण्याहून कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने गुप्तचर विभागाने दिलेल्या सूचनेमुळे सतर्कता अवलंबली असून वाहनांची तपासणी त्याचबरोबर संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर बारकाईने नजर ठेवण्याच्या उद्देशाने नाकाबंदी कायम केली आहे. महाड परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील ठेकेदार व भंगार व्यावसायिक यांच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची सविस्तर माहिती पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असल्याचे माहिती प्रभारी अधिकारी नंदकिशोर सस्ते यांनी दिली. नागरिकांना कुठेही संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्ती आढळून आल्यास त्यांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाणे अथवा पोस्ट, हेल्पलाइन क्र. १०९३ वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे स्थानिकांनी आपल्या जागेत भाडेकरू ठेवताना त्याची पूर्णपणे माहिती पोलिसांना द्यावी, योग्य ती खात्री करून भाडेकरार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यात राज्यमार्ग, महामार्गावर नाकाबंदी
By admin | Published: August 14, 2015 11:41 PM