महाड-पंढरपूर मार्गावर केबलसाठी रस्त्यालगत खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:06 AM2018-11-20T00:06:34+5:302018-11-20T00:06:46+5:30
महाड-पंढरपूर मार्गावर रस्त्यालगत केबलसाठी खोदकाम केले जात असल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे. वरंध घाटात अशाच खोदाईमुळे एसटी अपघाताला निमंत्रण मिळूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालक संतप्त आहेत.
महाड : महाड-पंढरपूर मार्गावर रस्त्यालगत केबलसाठी खोदकाम केले जात असल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे. वरंध घाटात अशाच खोदाईमुळे एसटी अपघाताला निमंत्रण मिळूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालक संतप्त आहेत.
डिजिटल इंडियाचा गवगवा करत गावागावात इंटरनेट पोहचवण्यासाठी अनेक गावातील रस्ते आणि महामार्ग, ग्रामीण रस्ते, राज्यमार्गाच्या बाजूपट्टीची बिनदिक्कतपणे खोदाई केली जात आहे. महाड- पंढरपूर मार्ग, महाड-रायगड मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, टोळ-आंबेत मार्ग अशा विविध मार्गावर खोदकाम झाले आहे. महाड-पंढरपूर मार्गावर ढालकाठी ते वरंध घाट या दरम्यान आता खोदकाम सुरू आहे.
वरंध घाटात ऐन दिवाळीत या खड्ड्यांमुळे एसटी अपघाताला निमंत्रण मिळाले, परंतु सुदैवाने मोठा अपघात व मनुष्यहानी टळली तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग जागे झालेले नाही. या अपघाताची पर्वा न करता आणि प्रशासनाला न जुमानता बिनदिक्कतपणे खोदकाम सुरूच आहे. या मार्गावर पुणे ते महाडपर्यंत कायम वर्दळ असते. छोट्या वाहनांबरोबरच एस.टी.च्या बसेस देखील कायम ये- जा करीत असतात. यामुळे साइडपट्टीलगत वाहने गेल्याने या केबलच्या चरात वाहन फसणे किंवा कलंडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ऐन पावसाळ्यात महाड-रायगड मार्गावर रस्त्यालगत झालेल्या खोदकामात वाहने अडकणे, कलंडणे असे प्रकार घडले. तरी देखील कोणतीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही.असाच प्रकार या मार्गावरही सुरू आहे.
रस्त्याचे नुकसान कंपन्यांकडून वसूल
कोणत्याही कंपनीकडून खोदकाम करण्यापूर्वी रस्त्याचे जे नुकसान होते त्यासाठी बांधकाम विभाग या कंपन्यांकडून रक्कम भरून घेते.
परंतु याचा अर्थ सर्वच ठिकाणी रस्त्याचे नुकसान करणे असा होत नाही.
अडचणीचे असेल तेथेच असे खोदकाम करायचे आहे, परंतु या नियमाला बगल देत काम सुरू आहे.