आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ रायगडकर उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 03:32 AM2019-02-17T03:32:23+5:302019-02-17T03:32:37+5:30
अनेक ठिकाणी कडकडीत बंद : रॅलीत सर्वपक्षीयांचा सहभाग; पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी
महाड : पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. या आत्मघाती हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले आहेत, त्यामुळे संपूर्ण देशावर दु:खाची छाया पसरली असून देशवासीयांमधून संताप व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त केला जात असून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
महाड शहरातील नागरिक शनिवारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. पााकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शहरातील सर्व मार्गावरून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, व्यापारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या संतप्त नागरिकांनी शहरातील प्रत्येक चौकात पाकिस्तानचे ध्वज जाळून संताप व्यक्त केला. मोर्चाचे छत्रपती शिवाजी चौकात सभेत रूपांतर झाले. या वेळी आमदार भरत गोगावले, पंचायत समिती सभापती सपना मालुसरे, मधुकर गायकवाड, माजी नगराध्यक्ष महमद अली पल्लवकर, सुधीर शेठ, बिपिन म्हामुणकर, नितीन पावले, अल्ताफ काझी, शरद गांगल, आदीची हल्ल्याच्या निषेधार्थ भाषणे झाली. शहरासह बिरवाडीतही सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.
शाहिदांना श्रद्धांजली
नागोठणे : नागोठणेतील शिवाजी चौकात दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी सर्वपक्षीय नेतेमंडळींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते. निषेध सभेनंतर शिवाजी चौक ते बाजारपेठ, खुमाचा नाका, गांधी चौक, प्रभुआळी, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणेमार्गे पुन्हा शिवाजी चौक असा मोर्चा काढण्यात येऊन पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
उर्दू शाळेत शहिदांना श्रद्धांजली
नागोठणे : रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या जवानांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
सुधागडात निषेध!
राबगाव/पाली : तालुक्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी पालीतील शिवाजी चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
फौजी आंबवडे येथील आजी-माजी सैनिक संघटनेकडून श्रद्धांजली
पोलादपूर : महाड तालुक्यातील सैनिकी परंपरा लाभलेल्या फौजी आंबवडे येथील आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. मातृभूमीसाठी शहीद झालेल्या वीर जवानांना संघटनेच्या वतीने देऊळकोंड येथील शहीद जवानांच्या क्रांती स्तंभाजवळ शनिवार भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी संघटनेचे माजी सैनिक अध्यक्ष सुभेदार काशिनाथ पवार, उपाध्यक्ष कॅप्टन विजय जाधव, सरचिटणीस हवालदार बाळाराम पवार, कॅप्टन दिनकर आहिरे, सुभेदार लक्ष्मण पवार, हवालदार महादेव गायकवाड, गंगाराम पवार, जनार्दन पवार, प्रभाकर पवार, श्रीरंग पवार, वासुदेव पवार, फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप पवार, माजी सरपंच रघुनाथ पवार, सखाराम पवार आदी उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष सुभेदार काशिनाथ पवार म्हणाले, फौजी आंबवडे गावाला सैनिकी परंपरा लाभलेली आहे. आम्ही शरीराने सेवानिवृत्त झालो असलो, तरी देशाला गरज असेल तर आजही लढायला तयार आहोत. देश दु:खात असताना कोणत्याही पक्षाने राजकारण न करता, देशवासीयांच्या भावनांचा विचार करावा, असे पवार म्हणाले.
रोह्यात मेणबत्ती मोर्चा
च्रोहा : शहरात गेल्या दोन दिवसांपासून विविध राजकीय पक्षांकडून निषेध मोर्चा काढण्यात आले. स्वयंसेवी संस्थांसह मोठ्या संख्येने नागरिक मेणबत्ती मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील राम मारुती चौकात वीर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी पाकिस्तानी दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे रोहा शिवसेनेने दहन केले. रोहा शिवसेनेच्या वतीने राम मारु ती चौकात पाकिस्तानी दहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
च्नेरळ : कर्जत तालुक्यातही कळंब येथे कडकडीत बंद पाळून दहशतवादी हल्लाचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शेकडो ग्रामस्थांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. या वेळी मुस्लीम समाजातील कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कर्जत-मुरबाड महामार्गावरील कळंब नाक्यावर शेकडोंच्या संख्येने जनसमुदायाने पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले. वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.