आगरदांडा : मुरूड नगर परिषद हद्दीतील सिद्धीनगर मोहल्ल्यात जाण्याकरिता एकमेव असलेला रस्ता खचल्याने येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर व्हावी याकरिता नगर परिषदेला कळविण्यात आले होते. परंतु दीड महिना झाला तरी नगर परिषदेकडून कोणताही अधिकारी रस्ता पाहणीकरिता आला नाही. हा रस्ता पूर्णत: खचल्याने या रस्त्यावरून चालताना व वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
या रस्त्यामुळे येथील नागरिकांचे तसेच लहान मुले सायकलवरून अनेक वेळा पडून छोटे अपघात झाले आहेत. तरी या रस्त्याकडे बघण्याकरिता कोणालाच वेळ मिळत नसल्याने शेवटी गुरुवारी महिलांनी मुरूड नगर परिषदेमध्ये येऊन रस्त्यासंदर्भात मुख्याधिकारी अमित पंडित यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी महिला म्हणाल्या की, या रस्त्यावरून जाणे-येणे कठीण झाले आहे.
मोठा अपघात होऊ नये म्हणून या रस्त्याची पाहणी करून रस्ता ताबडतोब दुरुस्त करून मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.या वेळी शहिदा मजगांकर, नाझीम दफेदार, आशियाना शहा, मुमताज हलडे, राहिना खान, नरगिस शेख, रिहाना जमादार, आयशा झोडे, सुरेय्या अन्सारी, मैमुना शेख, फातिमा सावरी, बाबू पठाण, फिरोज हलडे, सीमा दुकानदार , नझीर शेख , रजिया शाबाब, नाझिया सय्यद, अफरोजा अलिलशा, फातिमा सय्यद, मौज्जम पठाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.