महाड एमआयडीसीमधील रस्ता होणार खड्डेमुक्त; दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 11:37 PM2019-10-29T23:37:48+5:302019-10-29T23:38:09+5:30
कामगारांचा प्रवास होणार सुखकर
बिरवाडी : महाड एमआयडीसीमधील नांगलवाडी फाटा ते पंचतारांकित औद्योगिक वसाहत या आठ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आले आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचा प्रवास सुखकर होणार आहे.
महाड एमआयडीसीमधील नागलवाडी फाटा ते पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आठ किलोमीटरच्या रस्त्यावर पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता व अन्य कामाकरिता सुमारे तीन लाख रुपयांचा निधी प्रतिवर्षी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांमध्ये रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे व गवत काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी सूत्रांनी दिली आहे. बाजारमूल्या पेक्षा नऊ टक्के रक्कम कपात करून ही कामे देत आहेत. एमआयडीसीमधील रस्ते दुरुस्तीच्या कामाला ठेकेदार लाभत नसल्याने एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती रखडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने अपघाताचे प्रमाण कमी होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले होते मात्र निवडणुका झाल्याने दुरुस्ती कामाला वेग आला आहे.
भटक्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा; उपाययोजनेची मागणी
१) महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे दीडशे पेक्षा जास्त कारखाने कार्यरत असून या कारखान्यातून निर्माण होणारे उत्पादन हे परदेशात निर्यात करण्यात येते, त्यासोबतच महाराष्ट्र शासनाला हजारो कोटी रुपयांचा महसूल महाड औद्योगिक वसाहतीमधून प्राप्त होत आहे; मात्र या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास विलंब होत असल्याने या औद्योगिक वसाहतीचा विस्तार रखडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
२) महाड एमआयडीसीमधील नांगलवाडी फाटा ते पंचतारांकीत औद्योगिक वसाहत या किलोमीटरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा तारेचे बंदिस्त कंपाऊंड नसल्याने भटक्या जनावरांचा वावर मुख्य रस्त्यावर होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या समस्येकडे सबंंधितांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.