अलिबागमधील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:15 AM2019-07-30T01:15:46+5:302019-07-30T01:15:51+5:30
नागरिक त्रस्त : बांधकाम विभाग कार्यालयाचा रस्ता खड्ड्यात
अलिबाग : जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच रस्त्यांचीही चांगलीच दुरवस्था झाली आहे. रस्ते निर्माण करून रस्त्यांची डागडुजी करणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयही त्यातून सुटलेले नाही. या कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यात भला मोठा खड्डा पडल्याने पावसाचे पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था याच्यापेक्षा वेगळी नसल्याचे दिसून येते.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच तडाखा लावला आहे. त्यामुळे नद्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पाणी प्रमुख रस्त्यावर आले, तसेच पुराचे पाणी नागरीवस्त्यांमध्ये घुसून लाखो रुपयांची हानी झाली आहे. काही ठिकाणच्या शेतातील भाताचे पीक पाण्यात बुडाले होेते. पावसाच्या पाण्यामुळे आधीच डागडुजीला आलेल्या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग-मुरुड रस्ता, अलिबाग-रोहे, अलिबाग-रेवस, वडखळ-पेण यासह जिल्ह्यातील बहुतांश अंतर्गत रस्ते उखडले आहेत. काही ठिकाणी तर पाण्याच्या प्रवाहात अख्खे रस्तेच वाहून गेले आहेत. त्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेल्याचे दिसून येते.
अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. सर्व सरकारी, निम सरकारी, विविध बँका, वित्तीय संस्था यांची कार्यालये याच ठिकाणी आहेत. त्यामुळे कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक येत असतात, त्यामुळे येथील रस्ते सुस्थितीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे; परंतु रस्त्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने ठिकठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व रस्त्यांची देखरेख करण्याची जबाबदारी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, रस्ते विकास महामंडळ, नगरपालिका, जिल्हा परिषद यांची आहे.
अलिबाग बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे जो रस्ता जातो तिथे पावसाळ्यात तळे साचत असल्याने त्याचा त्रास शेजारीच असणाºया जिल्हा रुग्णालयात येणाºया रुग्णांना होत आहे. पाण्याचे डबके साचून तेथे डासांचा फैलाव होत आहे. यामुळे तापाच्या रु ग्णांमध्ये वाढ होत आहे. याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता लवकरच या रस्त्यावरील खड्ड्याची दुरुस्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, तुषार या शासकीय विश्रामगृहाकडे जाणाºया रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. या विश्रामगृहात पालकमंत्री, आमदार, खासदार यांचा सातत्याने वावर असतो. त्यांनाही ही परिस्थिती दिसून येत नाही
याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कडाव-वडवली रस्त्याची दयनीय अवस्था
कर्जत : कडाव-वडवली रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून येथून ये-जा करणे त्रासदायक झाले आहे. हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत आहे. या रस्त्यावरील खडी पूर्णपणे उखडली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही काळातच वरील डांबरी थर निघून खडी उघडी पडली आहे. यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. जिल्हा परिषदेने आणि ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन नागरिकांची त्रासातून सुटका करावी, अशी मागणी होत आहे. या खराब रस्त्यामुळे चालणेही अवघड झाले असल्याची प्रतिक्रिया वडवी ग्रामस्थ रसिका मराडे यांनी व्यक्त के ली.