बोर्लीपंचतनमधील रस्त्यांची दैना; चिंचबादेवी मंदिर रस्ता रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:23 PM2020-10-11T23:23:52+5:302020-10-11T23:24:06+5:30
खड्ड्यांमुळे दुरवस्था; नागरिक हैराण
बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावातील अंतर्गत एसटी स्टँड ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा, त्याचप्रमाणे चिंचबादेवी मंदिर रस्ता, मुख्य मशीद ते हनुमान मंदिर, वांजळे रस्ता, कोंढेपंचतन रस्ता व इतरही रस्त्यांची पार दैना उडाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असून, याकडे कोणी लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ व मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून बोर्लीपंचतन गावाची ओळख आहे, परंतु ही ओळख फक्त कागदावरच असल्याचे मागील काही वर्षांपासून दिसून येत आहे. बोर्लीपंचतन गावातील अंतर्गत रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून पुरती दैना उडाली असून, कोणत्याही राजकीय प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधींना या अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेकडे पाहण्यासाठी वेळच नाही की काय, असा प्रश्न नागरिकांना पडत असेल, तर त्यात नवल नाही. या अंतर्गत रस्त्यांमध्ये एसटी स्टँडपासून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्त्याची चाळण झाली आहे.
या रस्त्यातील मोठे दगड बाहेर आली असून, हा रस्ता चढावाचा असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणाऱ्या रुग्णांची वाहने येताना, तसेच अनेक मोटारसायकलस्वार या रस्त्यावर घसरल्याने दुखापत होण्याच्या घटना घडत आहेत. त्याचप्रमाणे, शिवाजी चौकापासून ग्रामपंचायती समोरून ग्रामदेवता चिंचबादेवी मंदिराकडे जाणारा रस्ताही पावसाळा असो किंवा कोणताही ऋतू असो सदैव खड्ड्यांनी भरलेलाच असतो. हा रस्ता बोर्लीपंचतन गावातील नागरिकांसाठी भावनेचा प्रश्न असल्याने, रस्त्यासाठी मागील वर्षामध्ये निधी मंजूर झाल्याचे येथील प्रमुख पक्षाकडून सांगण्यात येत होते, परंतु रस्त्यासाठी आम्हीच निधी मंजूर करून आणला आहे, या वादात रस्त्याची जैसे थे परिस्थिती आहे.
उंड्रे हायस्कूलजवळ तळे
मोहल्यातील मशिदीच्या समोरून हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता, सोनार आळी- मुस्लीम कब्रस्तान ते हनुमान मंदिर रस्ता, नागाव मोहळ्यातील रस्ते, वांजळे फाटा ते मोरटाकी विभाग, कोंढापंचतन गावाकडे जाणारा रस्ता व इतर अंतर्गत पुरता दैना उडाली आहे. हे सर्व रस्ते गेली अनेक वर्षे खड्ड्यांच्या साम्राज्याने वेढलेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यामध्ये बोर्लीपंचतनच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच एसटी स्टँड जवळ व उंड्रे हायस्कूलजवळ पाण्याचे तळे साचले जाते, याकडे संबंधित खाते का लक्ष देत नाही.