-संतोष सापतेश्रीवर्धन : तालुक्यातील प्रांत कार्यालय ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यामुळे म्हसळा व श्रीवर्धनमधील नागरिकांना कार्यालयीन कामासाठी ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील जनतेला प्रशासकीय कामे जलद गतीने करण्यात यावीत, यासाठी तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय यांनी वास्तू उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार संबंधित कार्यालयाचे काम पूर्ण झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत अंदाजे २०० मीटर रस्ता निर्माण केला गेला.
मात्र, आजमितीस या रस्त्याची पूर्णत: बिकट अवस्था झाली आहे. रस्त्याची खडी निघून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार व इतर वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेच्या हद्दीतील जवळपास सर्व जोडरस्ते सिमेंटचे बनवण्यात आले आहेत. मात्र, प्रांत कार्यालय त्याला अपवाद असल्याचे दिसून येते.
नवीन रस्ता निर्मितीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. त्या विषयी सर्व पत्रव्यवहार करण्यात आला आहे.- अमित शेडगे, प्रांताधिकारी, श्रीवर्धन
प्रांत कार्यालयाचा रस्ता खड्डेमय झाला आहे. तरी संबंधित रस्ता दुरुस्तीसाठी महसूल व बांधकाम खाते प्रयत्नशील असून मेपर्यंत हा रस्ता व्यवस्थित केला जाईल.- श्रीकांत गणगणे, वरिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
प्रांत कार्यालय रस्त्याचा प्रस्ताव पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे आढावा बैठकीत सादर केला असून, संबंधित खात्यांना पालकमंत्र्यांनी योग्य ते निर्देश दिले आहेत.- जितेंद्र सातनाक, नगराध्यक्ष, श्रीवर्धन