- कांता हाबळेनेरळ : नेरळ-कळंब या महत्त्वाच्या जिल्हा मार्गावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत असून वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. पोशीर गावाजवळ भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्त्याची साइडपट्टी खोदल्याने माती रस्त्यावर आली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल जमा झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.वरई येथील गृहप्रकल्पासाठी २२ केव्हीची भूमिगत वीजवहिन्या टाकण्यासाठी पोशीर गावाजवळ रस्त्याची साइडपट्टी खोदण्यात आली आहे. या भूमिगत वीजवाहिनीला स्थानिक नागरिक, शेतकरी, आणि चालकांनी विरोध दर्शविला आहे, तरीही हे काम सुरू करण्यात आले आहे. नियमबाह्य काम सुरू असून केवळ १३ ते १६ इंचावर ही २२ केव्ही इतक्या तीव्र क्षमतेची विद्युत वहिनी टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.खोदकाम करताना रस्त्याच्या कडेला शासकीय निधीतून लावलेली झाडेही नष्ट करण्यात आली आहे. साइडपट्टी खोदल्याने माती रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे रस्ता चिखलमय झाला असून दुचाकी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्यावर आलेली माती आणि चिखल बाजूला करावा आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी चालकांकडून होत आहे.रस्त्यालगतच्या कामासंदर्भात ठेकेदार कंपनीला आधीच नोटीस बजावली आहे. नुकसान झालेला रस्ता पूर्ववत करून द्यावा. रस्त्यावरील माती, चिखल दूर करण्याच्या सूचनाही ठेकेदार कंपनी आणि महावितरणला देण्यात आल्या आहेत.- अजयकुमार सर्वगोड,उपअभियंता बांधकाम विभागरस्त्याची साइडपट्टी खोदून ज्या ठिकाणी चिखल झाला आहे, त्या ठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे. रस्त्यावरील चिखल व नादुरुस्त झालेला रस्ता ठेकेदार कंपनीला पूर्ववत करण्यास सांगण्यात आले आहे.- आनंद घुळे,उप अभियंता, महावितरण-कर्जत
साइडपट्टी खोदल्याने रस्ता चिखलमय; नेरळ-कळंब दरम्यान वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:44 AM