पालीत बल्लाळेश्वर नगरमध्ये रस्ते पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:02 AM2017-08-03T02:02:35+5:302017-08-03T02:02:35+5:30
मुसळधार पावसामुळे पालीतील बल्लाळेश्वर नगरमधील व शिळोशी-मढाळी गावाकडे जाणाºया रस्त्यावर पाणी साठले आहे. यामुळे पादचारी व वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
पाली : मुसळधार पावसामुळे पालीतील बल्लाळेश्वर नगरमधील व शिळोशी-मढाळी गावाकडे जाणाºया रस्त्यावर पाणी साठले आहे. यामुळे पादचारी व वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. दरवर्षी येथील रस्ते पाण्याने तुंबतात त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
येथील सरकारी गोदामाजवळून बल्लाळेश्वर नगरमध्ये जाणाºया मुख्य रस्त्यावर प्रचंड पाणी साठते. या मार्गाच्या दोन्ही बाजूला कचरा व घाण टाकली जाते त्यामुळे येथे पाणी साठते. तसेच गोडावूनच्या बाजूने शिळोशी-मढाळी गावाकडे जाणाºया मार्गावर मराठा समाज हॉलच्या शेजारील मुख्य रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबते. बल्लाळेश्वर नगरमध्ये शवविच्छेनगृहाजवळील रस्त्यावर तसेच इतर दोन ते तीन ठिकाणच्या रस्त्यावर दरवर्षी पाणी तुंबते. हा संपूर्ण भाग सखल असल्याने पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग मिळत नाही त्यामुळे पाणी तेथेच तुंबते. या त्रासाने येथील नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. महिला, शाळकरी मुले आणि वृद्धांना या तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नाकीनऊ येते.
या पाण्यात नाले व गटारातील पाणी तसेच कचरा व घाण असते त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कायम स्वरूपाची ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.