कालवा फुटल्याने रस्ता गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:43 PM2019-09-16T23:43:29+5:302019-09-16T23:43:42+5:30
तालुक्यातील राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे कडाव-सापेले रस्ता वाहतुकीस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
संजय गायकवाड
कर्जत : तालुक्यातील राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे कडाव-सापेले रस्ता वाहतुकीस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राजनाला कालवा फुटल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग १ कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेला उक्रुळ -चांदई -कडाव -वदप -गौरकामत -दहिवली -कोंदीवडे या रस्त्यावरील तांबस गावापुढे रस्ता वाहून गेल्याने कडाव -सापेले रस्ता वाहतुकीस बंद आहे. तालुक्यातील कडाव -सापेले रस्त्यावरील भाग १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ५० मीटरचा रस्ता वाहून गेला आहे, दोन महिन्यांपासून रस्ता वाहून जाण्याची ही तिसरी घटना आहे. यंदा संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला त्यानंतर हा रस्ता वाहतुकीस बंद होता. तालुक्यातील रस्त्याविषयी आमदार सुरेश लाड यांनी उपोषणाचा इशारा दिला आणि काही रस्त्याविषयी उपोषण सुरू केले. त्या अगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता दुरुस्त केला. त्यानंतर पुन्हा जोरदार पावसामध्ये रस्त्याचा भाग खचला त्यावर पुन्हा डागडुजी करण्यात आली, मात्र रविवारी पुन्हा हा रस्ता वाहून गेला आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग -१ कार्यालयाचे उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या ठिकाणी राजनाला कालवा फुटला आहे तो दुरुस्त केला पाहिजे, तो दुरुस्त होत नाही तोपर्यंत रस्ता दुरुस्त केला तरी तो वाहून जाणार आहे, असे सांगितले.
।नागरिकांची गैरसोय
पाटबंधारे विभाग याबाबत उदासीन आहे त्यांच्या कार्यालयाकडून फुटलेल्या कॅनल दुरुस्तीबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही. दोन्ही कार्यालयाच्या तू तू मध्ये ऐन पावसाळ्यात मात्र नागरिकांचे हाल होत आहे. जांभिवली, गौरकामत, वदप, बारणे, तांबस, साळोख, सापेलेमधील नागरिकांची मात्र गैरसोय झाली आहे.
मुसळधार पाऊस पडत असल्याने राजनाला कालव्याला पाणी वाढते आणि ते पाणी फुटलेल्या ठिकाणाहून संपूर्ण रस्त्यावरून वाहते अनेक वेळा या परिसरातील मोºया गाळाने बंद झाल्या होत्या त्या साफ करण्यात आल्या. रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी खड्डा झाला आहे त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दगडी टाकून रस्ता बंद केला आहे व त्या ठिकाणी सावधान असा फलक लावला आहे, रस्त्याविषयी वरिष्ठांना लेखी कळवले आहे.
- अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग