अलिबाग रोहा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन
By राजेश भोस्तेकर | Published: November 1, 2022 04:35 PM2022-11-01T16:35:33+5:302022-11-01T16:36:40+5:30
अलिबाग रोहा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन आठ दिवसात काम सुरू करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग : ...
अलिबाग रोहा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन
आठ दिवसात काम सुरू करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : अलिबाग रोहा या रस्त्याच्या कामाचा नारळ फोडून वर्ष लोटले तरी काम अपूर्णच राहिले आहे. रस्त्याच्या खड्डेमय परिस्थिती विरोधात बेलकडे येथे काँग्रेस सेवा फाउंडेशन, रस्ते ऍक्टिव्हिस्ट यांच्यामार्फत मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचे रस्ता रोको आंदोलन पुकारले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनाची दखल घेत आठ दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाचे उप अभियंता राजीव डोंगरे यांनी दिले आहे. ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे आता आठ दिवसानंतर तरी रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागेल अशी आशा प्रवाशी मनात बाळगून आहेत.
अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष भास्कर चव्हाण, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड.उमेश मधुकर ठाकूर, युवा नेते अमीर उर्फ पिंट्या ठाकूर, रस्ते ऍक्टिव्हिस्ट दिलीप जोग, ऍड. अजय उपाध्ये, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते एस.एम.पाटील, संदीप गोठीवरेकर, मैनुद्दीन चौधरी ऊर्फ मोदीभाई, आदी कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते.
अलिबाग-बेलकडे वावे-रोहा मुख्य रस्त्याचे काम ठेकेदारास पावणे दोनशे कोटी कामाचा कार्यारंभ आदेश मिळून ४ वर्ष झाल्यावरही सुरू झाले नाही आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येण्याचे आश्वासन देऊन एक वर्ष पुरे झाले. मात्र रस्ता जैसे थे आहे. खड्डेमय रस्त्यानेच प्रवाशांना आजही प्रवास करावा लागत आहे. जनतेच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस सेवा फाउंडेशन व तर्फे अलिबाग-बेलकडे वावे-रोहा मुख्य रस्त्याचे काम त्वरित चालू व्हावे यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे रस्त्यावरील एक तास वाहतूक खोळंबली होती.
प्रवाशांना नाहक त्रास
सद्य:स्थितीत हा रस्ता खड्डेमय झाला आहे. पर्यायाने धुळीचे साम्राज्यही झाले आहे. सर्वसामान्य नागरीकांना गेली अनेक वर्ष या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळेच गेली अनेक वर्ष या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. शिक्षण आणि रोजगार या दोन महत्तम उद्देशाने बस, सितारा, रिक्षा, मोटारसायकल अश्या दुचाकी- तीनचाकी-चारचाकी वाहनांच्या सहाय्याने प्रवास करणारे अनेक नागरीक आहेत. यातही विद्यार्थी आणि जेष्ठ यांची संख्या अधिक आहे असे काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या निवेदनात नमूद करण्यात आले होते.
नारळ फोडा पण रस्ता करा
अलिबाग रोहा रस्त्याच्या कामाचा नारळ अनेक राजकीय नेत्यांनी फोडले आहेत. मात्र अद्यापही हा रस्ता खड्डेमयच राहिला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी यावेळीही दोन डझन नारळ आणले होते, ज्या नेत्यांना या रस्त्याचे नारळ वाढवायचे असतील त्यांनी हवे तेवढे नारळ वाढवावे पण हा रस्ता एकदाचा पुरा करावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.