नेरळमध्ये रस्त्याची कामे केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:22 AM2019-04-01T05:22:15+5:302019-04-01T05:22:36+5:30
नागरिकांची ग्रामपंचायतीकडे तक्रार : गैरसोयीबाबत व्यक्त के ली नाराजी
कांता हाबळे
नेरळ : रायगड जिल्हा परिषद रस्त्याचे काम करीत असलेल्या नेरळ गावातील अनेक रस्त्यांची कामे ठेकेदाराने अर्धवट ठेवली आहेत. रस्त्याची कामे पूर्ण करताना ठेकेदाराने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने नागरिकांनी नेरळ ग्रामपंचायतीला लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत नेरळ ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराला कामे बंद करण्याचे पत्र दिले आहे.
नेरळ गावातील रस्त्यांच्या कामांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्यांची कामे करीत होते. मात्र, त्या निधीमधून मंजूर असलेली आठ कामे करीत असताना ठेकेदाराकडून कामे होण्यासाठी स्थानिक नागरिकांना अनेक आश्वासने दिली गेली. ती कामे ठेकेदाराने रस्त्यावर काँक्रीटीकरण झाल्यानंतर पूर्ण केली नाहीत. आता त्या आठ कामांमधील शेवटचे काम नेरळ पाडा भागात रस्त्याचे सुरू आहे, ते काम काही दिवसांत पूर्ण होणार होते. मात्र, ते काम पूर्ण झाल्यावर संबंधित ठेकेदार कामे संपल्याने निघून जाणार याची खात्री पटल्याने नेरळमधील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार ठेकेदाराला नेरळ ग्रामपंचायतीने तक्रारी असलेल्या नागरिकांच्या अर्धवट कामाबद्दल जाब विचारला. त्या वेळी ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाही. खांडा भागातील तब्बल २०० मीटर रस्त्याचे काम अर्धवट आहे, त्याच वेळी अन्य ८० नागरिकांना ठेकेदाराने शब्द दिला होता, ती कामे अर्धवट आहेत. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीने नेरळ पाडा भागात सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडले आहे. नेरळ ग्रामपंचायत ठेकेदारावर कामे अर्धवट ठेवल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे. त्याआधी नेरळ ग्रामपंचायतीने फलक लावून जिल्हा परिषदेने नेमलेल्या ठेकेदाराने कामे अर्धवट ठेवल्याने आणि शेवटचे काम संपवून ठेकेदार निघून जाण्याच्या शक्यतेमुळे काम बंद केले असून, गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
मुरबाड रस्ता बंद राहणार
च्नेरळ पाडा भागातून जाणारा रस्ता हा पुढे मुरबाड रस्त्याला जोडला जात असल्याने गेल्या ५ मार्चपासून रस्ता बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता नेरळ ग्रामपंचायतीने रस्त्याचे काम बंद ठेवल्याने आणखी काही दिवस मुरबाड रस्ता बंद राहणार आहे. त्याचा परिणाम नेरळ गावातील व्यापारावर होत असल्याने नाराजीदेखील व्यक्त होत आहे.
रस्त्याची कामे जिल्हा परिषद करीत आहे, त्यात आमचा काही संबंध नाही; पण ठेकेदाराने नेरळमधील ग्रामस्थांना रस्ते करण्यासाठी अनेकांची घरे तोडली, अनेक बांधकामे तोडली, त्या वेळी संबंधित ठेकेदाराने आश्वासने दिली आहेत. त्यांच्याशी आमचा ग्रामपंचायतीचा संबंध नाही; पण नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पुढाकार घ्यावा लागला.
- जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ ग्रामपंचायत
नेरळ गावातील सर्व कामे ही नियमानुसार होतील. मात्र, ठेकेदाराने कोणाला शब्द दिला याबद्दल आमच्या खात्याचा काहीही संबंध नाही.
- ए. ए. केदार, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग
आम्ही आता नेरळ ग्रामपंचायतीकडून सर्व नागरिकांच्या तक्रारी या नेरळ पोलिसांकडे देणार आहोत. पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्त्याने बाधित झालेल्या नागरिकांची कामे पूर्ण करून घ्यावीत.
- अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ