एक महिन्यात होणार ३८६ कोटींच्या रस्तेकामांना सुरुवात; मंजुरी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:40 PM2019-10-31T22:40:25+5:302019-10-31T22:40:53+5:30

अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरुड, पोयनाड-नागोठणे रस्त्यांचा समावेश

Road work worth Rs. 1 crore will start in one month; In the final phase of approval | एक महिन्यात होणार ३८६ कोटींच्या रस्तेकामांना सुरुवात; मंजुरी अंतिम टप्प्यात

एक महिन्यात होणार ३८६ कोटींच्या रस्तेकामांना सुरुवात; मंजुरी अंतिम टप्प्यात

Next

आविष्कार देसाई 

अलिबाग : खड्ड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नागरिकांना अजून एक महिन्याचा अवधी लागणार आहे. अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरुड आणि पोयनाड-नागोठणे या ३८६ कोटी रुपयांच्या रस्त्यांची मंजुरी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतर लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित ठेकेदारांना पुढील दहा वर्षे रस्त्याची डागडुजी करावी लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच रस्ते व्यवस्थित बनवण्याकडे त्यांचा कल राहणार असल्याने दर्जदार रस्ते नागरिकांना मिळणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्येमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. खराब रस्त्यातून प्रवास करणे मुश्कील झाल्याने नागरिक प्रवास करण्याचे टाळत आहेत. मात्र, कामानिमित्त नियमित बाहेर पडणाऱ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना पाठीच्या मणक्याचे, मानेचे, कंबरचे विकार सुरू झाले आहेत. काही ठिकाणी अपघात घडून काहींच्या जीवावर बेतले आहे. खराब रस्त्यांमुळे सातत्याने वाहनामध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले आहे. खड्ड्यांच्या प्रश्नी अनेक सामाजिक संघटना, विक्रम रिक्षा संघटना, नागरिक रस्त्यावरती उतरले होते. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात येऊनही त्यामध्ये फरक पडत नव्हता.

खड्डे भरण्यासाठी या आधी निविदा मागवण्यात येत होत्या. २०१७-१८ साली खड्डे भरण्यासाठी पाच लाख रुपयाचा मंजूर झालेला निधी २०१९ च्या गणेशोत्सवाच्या कालावधीत खड्डे भरण्यासाठी वापरण्यात आला होता. २०१५ नंतर खड्डे भरण्यासाठी निविदा मागवण्यावर सरकारनेच निर्बंध आणले. खड्ड्यांवरच कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा कोट्यवधी रुपयांचे नव्याने चांगले रस्ते निर्माण करण्यावर सरकारने जोर दिला आहे. आधी रस्ते निर्माण करताना ठरावीक किलोमीटरचेच तयार केले जायचे. त्यामुळे सलग रस्ते निर्माण केले जात नसल्यामुळे आधीचे रस्ते खराब व्हायचे. त्यामुळे यामध्ये कोट्यवधी रुपयांची हानी व्हायची; मात्र कोणत्या ना कोणत्या ठेकेदारीची निश्चितपणे चांदी व्हायची. सरकारच्या हे लक्षात आल्यामुळे हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी रस्ते निर्मितीवर भर देण्यात आला. मात्र, हायब्रीड अन्युयिटी अंतर्गत तयार होणाºया रस्त्यांचा ठेका २०० कोटी रुपयांच्या वर असल्यामुळे निविदेला कोणत्याच ठेकेदार कंपनीने प्रतिसाद दिला नाही. निविदा पुन्हा काढाव्या लागल्या होत्या. सक्षम ठेकेदाराकडून काम करून घेण्यासाठी सरकारने पाऊल उचलले होते. मात्र, नंतर सरकारने आता हेच काम काही भागांमध्ये करण्याला मंजुरी दिली आहे.

रस्त्यांची कामे सातत्याने त्याच त्याच ठेकेदारांना देण्यात येत असल्याने रस्त्यांच्या कामांचा दर्जा चांगला नसल्याने रस्ते खराब होऊन मोठे खड्डे पडायचे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च केले तरी त्याचा फायदा नागरिकांना मिळत नव्हता. आताच्या कामांमध्ये एकही स्थानिक ठेकेदार नसल्याने रस्त्यांची कामे व्यवस्थित पार पडतील, असा विश्वास भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ठेकेदाराने रस्त्यांचे काम केल्यावर पुढील दहा वर्षे त्यांनीच त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करायची, अशी अट असल्याने रस्त्यांचा दर्जा सुधारेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अलिबाग-रोहा रस्त्यासाठी २२९ कोटी
अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरुड, पोयनाड-नागोठणे येथील रस्त्यांचे काम आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अलिबाग-रोहा रस्त्यांसाठी सुमारे २२९ कोटी ११ लाख रुपये, अलिबाग-मुरुड रस्त्यासाठी सुमारे ११५ कोटी रुपये पोयनाड-नागोठणे मार्गासाठी ४२ कोटी ७४ लाख रुपये खर्च येणार आहे. या रस्त्यांच्या कामाची मंजुरी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सुमारे एक महिन्यामध्ये या रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. पोयनाड-नागोठणे रस्त्याच्या कामाचा ठेका पी.पी. खारपाटील यांना देण्यात आला आहे, तर अलिबाग-रोहा रस्ता ज्युगल किशोर अग्रवाल आणि अलिबाग-मुरुड रस्त्याचे काम अ‍ॅशकॉन कंपनीला मिळाला आहे.

रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. एक महिन्यामध्ये रस्त्यांच्या कामांना सुरुवात होईल आणि नागरिकांची खराब आणि खड्डेमय रस्त्यांच्या त्रासातून सुटका होईल. नागरिकांना चांगले आणि दर्जेदार रस्ते मिळतील. - मधुकर चव्हाण, उपअभियंता

Web Title: Road work worth Rs. 1 crore will start in one month; In the final phase of approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.