सभापतींच्या तक्रारीनंतर नवीन पनवेलमधील रस्त्यांची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 12:56 AM2021-01-08T00:56:33+5:302021-01-08T00:56:39+5:30
सिडकोला आली जाग : इतर रस्त्यांच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : सिडकोने नवीन पनवेलमधील रस्त्यांची कामे अखेर सुरू केली आहेत. मात्र ती करताना काही ठिकाणीच चांगले काम सुरू असून सभापतींनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या कामांना सुरुवात झाली आहे.
महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने नागरी सोयीसुविधांचे हस्तांतरण सुरू आहे. ते करताना रस्ते, गटारे, पदपथ, पथदिव्यांची डागडुजी करण्याची अट सिडकोने घातली आहे. त्यामुळे खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल येथील कामे सध्या सुरू आहेत. खराब रस्त्यांची डागडुजी करणे, पदपथ पूर्ववत करणे, गटारांची दुरुस्ती करण्याचे काम झेनिथ कन्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. हस्तांतरण झाल्यास सिडकोकडून काम करण्याची ही कदाचित शेवटची वेळ आहे. यापूर्वी सिडकोच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह होते. सिडकोने नवीन पनवेलमध्ये २० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करून ही कामे सुरू केली आहेत.
महिनाभरापूर्वी स्थायी समिती सभापती आणि नवीन पनवेलचे नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सिडकोचे मुख्य अभियंता के. एम. गोडबोले यांच्याकडे रस्त्याच्या कामाजी डागडुजी योग्य पद्धतीने केली नाही, तर रस्त्यावर झोपून आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्यानंतर नवीन पनवेलमधील सेक्टर १ ते ११मधील रस्ते दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. शेट्टी यांच्या तक्रारीनंतर नवीन पनवेलहून खांदा कॉलनीच्या उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्याची डागडुजी करण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू करण्यात आले. खराब रस्त्यावर पृष्ठभाग गुळगुळीत करून रस्ता बनविण्याचा भास निर्माण करणाऱ्या ठेकेदाराने हा संपूर्ण रस्ता खोदून नव्याने बनविला. मुख्य रस्ता बनविला मात्र इतर खराब रस्त्यावर डांबर अंथरून रस्ता वरून वरून चकाचक केला जात आहे.
रस्त्याचे काम सिडकोकडून कोट्यवधी रुपये खर्च करून केले जात आहे. हे काम केल्याचा देखावा सिडकोचा ठेकेदार करणार असेल तर हस्तांतरण झाल्यास महापालिकेला पुन्हा काही वर्षांतच रस्त्याच्या कामाला पैसे खर्च करावे लागतील. म्हणून आता याची तक्रार पुन्हा सिडको आणि महापालिका प्रशासनाकडे करणार आहे.
- संतोष शेट्टी (स्थायी समिती सभापती, पनवेल महानगरपालिका)