अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रेवस, अलिबाग-रोहे, अलिबाग-मुरुड या ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातील काही रस्त्यांची कामे काही महिन्यांपूर्वीच झाली आहेत. त्यामुळे केलेला खर्च वाया गेल्याचे बोलले जाते.रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्याचप्रमाणे येथे विविध कारखाने उभे आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने येथे अवजड वाहतुकीबरोबरच हलकी वाहतूकही होते. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्याही बेसुमार होते. रस्ते चांगल्या दर्जाचे होत नसल्याने काही महिन्यांमध्येच त्या रस्त्यांची दुरवस्था होत आहे.रस्त्यांवर लाखो रुपये खर्चूनही नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्याने प्रचंड नाराजी आहे. रस्ते सुस्थितीमध्ये राहावेत यासाठी विविध राजकीय पक्षांनी, विविध संघटनांनी मोर्चे, आंदोलने केली होती. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील काही विभागातील रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. परंतु पहिल्याच पावसामध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने बांधकाम विभागाच्या कामांची पोलखोलझाली आहे.अलिबाग तालुक्यातील सहाण- रोहे, पोयनाड नागोठणे, तसेच कार्लेखिंडीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे नावगावमधील काँक्रीटचे रस्ते एक वर्षाच्या आतच खराब झाले आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील किहीम, थळ येथील रस्तेही खराब झाले आहेत. रस्त्यांच्या कामावर लाखो रुपये खर्च करुनही उपयोग होत नाहीत. याला प्रशासन जबाबदार आहे. याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन आणि ठेकेदार यांचे साटेलोटे जगजाहीर आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावालागत आहे.कॉंक्रीटचे रस्ते जेथे खराब झाले आहेत. तेथील अखंड पॅच काढून तो नव्याने तयार केला जाईल. त्याचप्रमाणे अलिबाग-रेवस मार्गावरील साईडपट्ट्यांवर पडलेले खड्डे तातडीने भरण्यात येतील असे अलिबागचे उपअभियंता चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.पनवेल : पहिल्याच पावसात पनवेल शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पनवलेकरांचा प्रवास खडतर झाला आहे. पावसाचे पाणी साचून रस्त्यावर तयार झालेल्या डबक्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरदिवशी लहान-मोठे अपघात होत आहेत. एकूणच या खड्डेमय प्रवासाला पनवेलचे रहिवासी वैतागले आहेत. पनवेल शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. शहरात न्यायालय, मुख्य बाजारपेठ, तहसील कार्यालय, महानगर पालिका मुख्यालय, रेल्वे स्टेशन, दवाखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती आदींसह महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. यामुळे शहरात नागरिकांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. संपूर्ण तालुक्यातील रहिवासी विविध कामांसाठी शहरात येतात. परंतु शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पहिल्याच पावसात बहुतांशी रस्ते उखडले गेले आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यातील रस्ते खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:44 AM