रस्ते, पुलांचे काम संथगतीने, जेएनपीटी परिसरात वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 01:26 AM2019-09-29T01:26:56+5:302019-09-29T01:27:19+5:30

जेएनपीटीमार्फत एनएचआयच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेले जेएनपीटी-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे दरम्यान सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले अनेक उड्डाणपूल व रस्त्याची कामे मुदतीत पूर्ण न झाल्याने रखडली आहेत

Roads, bridges work slowly, traffic congestion in JNPT area | रस्ते, पुलांचे काम संथगतीने, जेएनपीटी परिसरात वाहतूककोंडी

रस्ते, पुलांचे काम संथगतीने, जेएनपीटी परिसरात वाहतूककोंडी

Next

- मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीटीमार्फत एनएचआयच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेले जेएनपीटी-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे दरम्यान सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले अनेक उड्डाणपूल व रस्त्याची कामे मुदतीत पूर्ण न झाल्याने रखडली आहेत. जेएनपीटीकडूनही या कामांची पाहणी करूनच एनएचआयला वित्तपुरवठा करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे न होता या कामांत निधीची उधळण केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्षभराची मुदतवाढ दिल्यानंतरही उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या कामांची गती पाहता, उरलेल्या सात महिन्यांतही ते पूर्णत्वास जाईल, असे दिसत नाही. त्यामुळे पुढील वर्षभर तरी नागरिकांना वाहतूककोंडी आणि अपघातांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे जेएनपीटी-एनएचआय या दोन्ही अधिकाऱ्यांचा गैरप्रकार आणि अनास्थेची चौकशी करण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

जेएनपीटी बंदराचा औद्योगिक पसारा वाढताच बंदरातून कंटेनर मालाची देशभरात रस्त्यांमार्गे वाहतूक सुकर करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे सुरू करण्यात आली. यात एलिव्हेटेड कॉरिडोर, भुयारी मार्ग, गव्हाण फाटा इंटरचेंज उड्डाणपूल, जेएनपीटी-आम्रमार्गावरील किल्ले जंक्शन पूल, करळफाटा येथील पूल आदी सहा फ्लायओव्हर आणि जेएनपीटी-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे दरम्यानच्या सहा-आठ पदरी मार्ग, सर्व्हिस रोड आदी कामांचा समावेश आहे. सात उड्डाणपुलांच्या कामांसाठी २,६८० कोटी आणि रस्त्यांच्या कामांसाठी ३२० कोटी असा सुमारे तीन हजार कोटींचा निधीची तरतूद केली आहे. यासाठी जेएनपीटीने मुंबई-जेएनपीटी पोर्ट रोड कंपनी लिमिटेडची स्थापना केली आहे.

जेएनपीटी-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे दरम्यान उभारण्यात येणारे उड्डाणपूल आणि रस्त्यांची कामे जेएनपीटीने नॅशनल हायवे इंडियाच्या (एनएचआय) माध्यमातून सुरू केली आहेत. यासाठी जेएनपीटीने एनएचआयला २६८० कोटीची रक्कम कर्जाऊ दिली आहे. मात्र, उड्डाणपूल असोत की सहा-आठ लेनची रस्त्यांची कामे, कोणतीही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या कामांसाठी वर्षभराची मुदतवाढ म्हणजे एप्रिल २०२० पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मात्र, कामांची गती पाहता सहा महिन्यांतही ही कामे पूर्ण होतील, याची कोणतीही शाश्वती दिसत नाही.

जेएनपीटीकडून कामाचा दर्जा, किती काम पूर्ण झाले याची पाहणी न करताच, एनएचआयला रक्कम अदा केली जात आहे. मनसे आणि जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मनसे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी थेट जेएनपीटी अधिकाऱ्यांवरच गैरव्यवहाराचे आरोप केले होते. कामे वेळात पूर्ण न झाल्याने वाहतूककोंडीचा, अपघाताची समस्या वाढल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे यापुढे एनएचआयला निधी देताना कामाची गुणवत्ता, गती आणि झालेल्या कामाइतकाच निधी अदा करण्याच्या सूचना सेठी यांनी अधिकाºयांना केल्या आहेत.

उड्डाणपूल, रस्ते आणि विविध विकासकामांसाठी जेएनपीटीने एचएसबीसी या विदेशी बँकेकडून ४०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. जेएनपीटी-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे दरम्यानच्या सहा उड्डाणपूल आणि परिसरातील सहा-आठ लेन ४२ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची व एलिव्हेटेड कॉरिडोरची कामे एनएचआयला दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून सुरू आहेत.
- राजेश म्हात्रे, उपप्रबंधक,
पत्तन योजना विभाग,
जेएनपीटी

रखडलेले रस्ते आणि पुलांच्या कामांमुळे सातत्याने वाहतूककोंडी होत आहे. या विरोधात सर्वच स्तरातून आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. या संघर्षानंतर नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाची पोलीस उपायुक्त सचिन लोखंडे यांच्या सोबत बैठकही झाली. त्यानंतर दोन दिवस वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू झाली होती. मात्र, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा वाहतूककोंडीची समस्या सुरू झाली आहे.

जेएनपीटी-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे दरम्यानचे उड्डाणपूल आणि रस्त्यांची व कॉरिडोरची रखडलेली कामे जून २०२० पर्यंत पूर्णत्वास जातील, अशी माहिती एनएचआयचे व्यवस्थापक प्रशांत फेगडे यांनी दिली असून, वाहतूककोंडी सोडविण्याची समस्या पोलिसांची असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Roads, bridges work slowly, traffic congestion in JNPT area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.