रोहा तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:02 AM2019-09-22T00:02:17+5:302019-09-22T00:02:24+5:30
नागरिक संतप्त; सिटीझन्स फोरमने घेतली उपविभागीय अभियंता यांची भेट
रोहा : तालुक्याला जोडणाºया सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कोलाड, मुरुड आणि अलिबाग हे मार्ग उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांत दुचाकी वाहनांचे चाक अडकून प्रवासी जखमी होत आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनांना अपघात होत आहेत. रोहा तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन रोहा तालुका सिटीझन्स फोरमच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अभियंता यांची भेट घेऊन ररस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने भरण्याची सूचना केली आहे.
तालुक्यातील कोलाड राज्यमार्गावरील एच पी पेट्रोल पंप ते एक्सेल स्टॉप दरम्यान भयानक मोठमोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यात वाहनांची चाके अडकून पडत आहेत. मागील आठवडाभरात एकही दिवस असा गेला नाही की या मार्गावरील खड्ड्यात वाहनांचे चाक अडकून अपघात घडला नाही. कोलाड आणि मुरुड मार्गावर सातत्याने वर्दळ सुरू असून धाटाव येथील औद्योगिक क्षेत्र, शाळा, महाविद्यालय आदींसह रोहा शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. या मार्गावर लहान मोठ्या वाहनांसह जड -अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. धाटाव एमआयडीसीत येणारा कामगार वर्ग तसेच शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी वेळेवर पोहचण्याच्या नादात घाईघाईत ये-जा करीत असतात, अशा वेळी हे भले मोठे खड्डे अपघाताला कारण ठरत आहेत. यंदा झालेल्या मुसळधार पावसाने कोलाड, मुरुड आणि अलिबाग राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले असून ते चुकविण्याच्या नादात दुचाकी गाड्यांची चाके खड्ड्यात अडकली जाऊन अपघात होत आहेत. या अपघातांचे पर्यवसान विवादात होत असून चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचे स्वरूप मोठे असल्याने चारचाकी छोटी वाहनेही अडकून राहत आहेत. दुसरीकडे या खड्ड्यांमधून पादचाºयांवर उडणारे चिखलही वादाचे विषय ठरत असल्याचे प्रवासी आणि नागरिक संतप्त आहेत. प्रवाशांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन रोहा तालुका सिटीझन्स फोरमच्या शिष्टमंडळाने निमंत्रक आप्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता ए. डी. देवकाते यांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली व रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने भरण्याची सूचना केली आहे. यावेळी राजेंद्र जाधव, नीलेश शिर्के , महेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
कोलाड मार्गावर रोहा स्वागत कमानी, वरसे राठी स्कूल, एच पी पेट्रोल पंप, पालदाड पूल, एक्सलस्टॉप, एम. बी. मोरे शाळा, जैनवाडी धाटाव, बरसोली, किल्ला कृषी विद्यापीठ, संभे, आंबेवाडी, कोलाड नाक्यापर्यंत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते याचा अंदाज करता येत नाही, तर मुरुड मार्गावर जिथे तिथे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रोहा नगरपालिकेकडे असलेल्या रोहा तहसील कार्यालय ते म्हाडा वसाहत हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पुढे खारी, कुंभोशी, चणेरा, पारंगखार रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रोहा पोलीस स्टेशनपासून सर्व रस्ता उखडलेला आहे. मुरुडप्रमाणेच अलिबाग रस्त्याचीही अवस्था भयंकर झाली असल्याने कोणत्या रस्त्याने अलिबागला जावे असा प्रश्न रोहेकरांना भेडसावत आहे. तर या सर्वच मार्गांवरून प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
कोलाड, मुरुड आणि अलिबाग या सर्व मार्गांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेच अंत न पाहता तातडीने रस्त्यांवरील खड्डे भरावेत.
- आप्पा देशमुख, निमंत्रक -रोहा तालुका सिटीझन्स फोरम.
खड्डे भरण्याचे काम सुरू केलेले असून खड्डे तातडीने भरण्याच्या सूचना ठेकेदारांना दिलेल्या आहेत. कोलाड ते चणेरा पारंगखार हा रस्ता पावसाळ्यानंतर नव्याने बांधण्याचे प्रस्तावित आहे. रोहा शहरातून जाणारा दमखाडी ते म्हाडा वसाहत दरम्यान असलेला रस्ता हा रोहा नगरपालिकेच्या ताब्यात असून तेथील खड्डे पालिका प्रशासनाने भरावयाचे आहेत.
- ए. डी. देवकाते, उपविभागीय अभियंता,
बांधकाम विभाग