जिल्ह्यातील रस्त्यांवरील प्रवास खडतर, अतिवृष्टीमुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:32 AM2019-08-20T00:32:15+5:302019-08-20T00:32:30+5:30

रायगड जिल्ह्यातून मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग असे महत्त्वाचे मार्ग जातात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अन्य काही राज्य मार्गही आहेत.

Roads in the district suffer from severe, heavy rainfall | जिल्ह्यातील रस्त्यांवरील प्रवास खडतर, अतिवृष्टीमुळे नुकसान

जिल्ह्यातील रस्त्यांवरील प्रवास खडतर, अतिवृष्टीमुळे नुकसान

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : गेल्या महिनाभर पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने नद्यांना पूर आला होता. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने रस्तेही पाण्याखाली गेले होते. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी हेच चित्र दिसत होते. पावसामध्ये जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यांवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. काहीच दिवसांवर गणेशोत्सवाचा सण आला आहे. त्यामुळे बाप्पा आणि गणेश भक्तांसाठी रस्त्यांचे विघ्न उभे राहणार असल्याने संबंधित विभागांना रस्ते मुदतीमध्ये सुस्थित करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात बरसून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची चिंता लागली होती. मात्र आॅगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच धमाकेदार एन्ट्री करत जोरदार बरसला. पावसाचा जोर सातत्याने वाढल्याने जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात सरासरी तीन हजार १०० मिमी पावसाची नोंद होते, मात्र या वर्षी पावसाने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. तब्बल साडेतीन हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.
या आधी पडणाºया पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था होत होती. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने खड्डे आणि रस्ते यांच्यातील फरक करणे कठीण असायचे. या वर्षीतर विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची हालत काय झाली असेल याचा विचारच न केलेला बरा.
रायगड जिल्ह्यातून मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग असे महत्त्वाचे मार्ग जातात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अन्य काही राज्य मार्गही आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतही मोठ्या संख्येने रस्ते आहेत. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या अखत्यारीत असणाºया रस्त्यांचे मोठे जाळे विणलेले आहे.
या सर्व रस्त्यांची प्रचंड दैना उडाली आहे. रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेले आहेत, तर काही ठिकाणचे रस्तेच पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे.
काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. कोकणात या सणाला फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येने चाकरमानी हा सण साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या घरी जातात.
रस्त्यांची झालेली हालत पहात येथील रस्ते प्रवासासाठी योग्य असल्याचे दिसून येत नाहीत. गणेशोत्सवाच्या आधी तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाच्या आधी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करावा असे आदेश मध्यंतरी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. त्यानंतरही पाऊस सुरूच होता. त्यामुळे रस्त्यांच्या डागडुजीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचे दिसून आले नाही.

ग्रामीण भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष
पावसाने आता बºयापैकी उघडीप दिली आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते सुस्थिती करणे बंधनकारक झाले आहे.
सरकार आणि प्रशासन मुंबई-गोवा महामार्गावर लक्ष केंद्रित करेल त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, मात्र जिल्ह्याच्या अंतर्गत भागावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
नेहमीच मोठे महामार्ग दुरुस्त केले जातात, मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला खड्ड्यातून प्रवास करावा लागतो.
तरी प्रशासन आणि सरकार या दोघांनीही ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

पाली - खोपोली राज्यमार्गाला तलावाचे स्वरूप
पाली : पाली -खोपोली रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहनचालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्याची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे देखील वाकण -पाली- खोपोली रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. ठेकेदाराने ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे व लक्ष देणे अपेक्षित आहे त्याप्रमाणात लक्ष न देता चालढकल सुरू आहे. जिथे खड्डे पडले आहेत तिथे खडी टाकल्याने वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटकांची फार मोठी गर्दी या रस्त्यावर दिसून येत आहे. वाहनांची प्रचंड संख्या पाहता अनेकदा वाहतूककोंडी होत आहे.
वाकण- पाली -खोपोली रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला आहे. मात्र या रस्त्याची अवस्था ही ग्रामीण रस्त्यासारखीच झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक व प्रवासी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले असून संबंधित खाते व ठेकेदार लक्ष देईल का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. वाहनचालक आणि प्रवासी यांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहेच शिवाय वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जात असतानाच मोकाट जनावरे आणि भटके कुत्रे यांचीही फार मोठी समस्या या मार्गावर दिसून येते. मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध आपली बैठक मारतात तसेच अचानकपणे मध्येच येतात. त्यामुळे वाहन घसरण्याचा प्रकार घडतो. तसेच भटक्या कुत्र्यांमुळे देखील वाहन चालविणे अडचणीचे होऊन बसले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाºया रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम काही ठिकाणी सुरू केले आहे. पाऊस आला नाही तर, गणेशोत्सवाच्या आधीच रस्त्यांची डागडुजीची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- आर.एस.मोरे,
कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पावसामुळे काही ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत. पेण-वडखळ या भागातील रस्त्यांची हालत बिकट आहे. रस्ते सुस्थितीत करण्याचे काम सुरू केले आहे. २६ आॅगस्टपर्यंत ते पूर्ण करण्यात येईल, गणेश भक्तांना त्रास होणार नाही.
- प्रशांत फेगडे, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग

Web Title: Roads in the district suffer from severe, heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड