लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. रुंदीकरण असो अगर रस्त्यांची डागडुजी ही सगळीच कामे रखडली आहेत. तर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तालुक्यातील बहुतेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. प्रमुख मर्गांचे रुंदीकरण, महाडमधून गेलेला मुंबई गोवा महामार्ग तसेच आर्थिक वर्षात निधी संपवण्याची घाई करून ग्रामीण भागात केलेले रस्ते आणि औद्योगिक क्षेत्रात असलेल्या सर्वच रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. यामुळे याचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे.
महाड-महाप्रळ-पंढरपूर, महाड, किल्ले रायगड, महाड एमआयडीसी, बिरवाडी या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. महाड-महाप्रळ-पंढरपूर आणि महाड-किल्लेरायगड या दोन्ही रस्त्यांची कामे अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतली आहेत. आपल्या क्षमतेपेक्षा कामासाठी खोदकाम करून संपूर्ण रस्ते खड्डेमय करून ठेवले आहेत. यामुळे किल्ले रायगडावर जाणारे आणि महाप्रळ मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत. पावसाळ्यापूर्वी कंपनीने किती टक्के काम करता येणे शक्य आहे तेवढेच खोदकाम केले असते तर हा त्रास झाला नसता. गेली अनेक वर्षांपासून महाड औद्योगिक वसाहतीमधून जाणारा महाड एमआयडीसी बिरवाडी हा मार्ग अशाच पद्धतीने देखभाल दुरुस्तीवर लाखो रुपये खर्चून खड्ड्यात घातला जात आहे. याठिकाणीदेखील प्रतिवर्षी खड्डे भरण्याचे काम केले जात आहे. मात्र अवजड वाहनांमुळे हा रस्ता पावसाच्या पहिल्या आठवड्यातच खड्डेमय बनला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी भरणे आवश्यक होते. मात्र आता भरपावसात माती आणि खडी टाकून मलमपट्टी केली जात आहे.
विद्यार्थ्यांची पायपीट महाड तालुक्यातील बहुतांश ग्रामीण रस्ते हे जिल्हा परिषदेच्या ताब्यातील आहेत. जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागाला जोडणारे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. यामुळे गाव तिथे जाणारी एसटी सुविधादेखील ठप्प झाली आहे. गावात एसटी जात नसल्याने शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.
८० ते ८५ रस्ते खराब झाले आहेत. यंदा पावसाळ्यात रावढळ गावात आणि कोतुर्डे निवाची वाडी येथे साकव कोसळले आ हे. याची दुरुस्ती लवकरच करण्यात येणार असून ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गाच्या दुरुस्तीसाठी २० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे.
-नरेंद्र देशमुख, उपअभियंता, बांधकाम विभाग महाड