उरणमधील ३५ गावांतील रस्ते बनले डम्पिंग ग्राउंड..!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:33 AM2023-09-01T11:33:32+5:302023-09-01T11:33:53+5:30
उरण तालुक्यातील ३५ पैकी एकाही ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची सुविधा नाही.
उरण : स्वच्छ भारत अभियानाचे उरणच्या ग्रामपंचायतींनी तीनतेरा वाजवले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून परिसरातील रस्त्यांचे डम्पिंग ग्राउंड केल्याचे चित्र उरण तालुक्यात दिसून येत आहे. अशा जागोजागी साठलेल्या कचऱ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उरण तालुक्यातील ३५ पैकी एकाही ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची सुविधा नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील दररोज जमा होणारा सुमारे १०० टन कचरा मिळेल त्या जागी, दिसेल तिथे ठिकठिकाणी रहदारीच्या रस्त्यांच्या दुतर्फा जागेवर टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांना नाक दाबून प्रवास करावा लागत असल्याची माहिती अनंत नारंगीकर यांनी दिली.
सध्या मोठ्या प्रमाणात केरकचरा हा चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, एकीकडे शासन स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करीत असताना ग्रामपंचायती मात्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत.
ग्रामस्वच्छतेसाठी शासन आग्रही आहे. विविध योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चही केले जातात. मात्र, त्यानंतरही उरण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालेला दिसतो आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या कायम
मागील अनेक वर्षांपासूनच चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिडको, जिल्हाधिकाऱ्यांकडे डंपिंग ग्राऊंडची मागणी करण्यात आली आहे. मात्र मागणी अद्यापही पुर्ण झाली नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या कायम सतावत असल्याची प्रतिक्रिया चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अमित भगत यांनी दिली.
उपाययोजना करणार
सध्याच्या घडीला ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची कोणतीही सोय नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. सिडको, जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेसाठी मागणी केल्याची माहिती खोपटा-बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर यांनी दिली.
उरण तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतींकडे डम्पिंग ग्राउंड नाही. डम्पिंग ग्राउंडसाठी उरण तहसीलदार, सिडको तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांनी दिली.