कर्जत : नेरळ विकास प्राधिकरणामधून नेरळ गावाला बायपास ठरेल अशा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. दोन साकव आणि दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता. या रस्त्याची अवस्था पाहून पहिल्याच पावसात रस्त्यावर केलेला खर्च पाण्यात गेला असल्याचे दिसून येत आहे.नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायतींचा मिळून नेरळ विकास प्राधिकरण निर्माण झाला आहे. या प्राधिकरण हद्दीतील नागरी विकासाला महत्त्वपूर्ण ठरणार म्हणून जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी पुढाकार घेऊन कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील पेशवाई रस्ता कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याला जोडण्यासाठी निधी मंजूर केला. दोन साकव आणि दोन किलोमीटर लांबीच्या अंतराचा रस्ता तयार करण्यासाठी साडेचार कोटीरुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातून कल्याण-कर्जत रस्त्याने दामत रेल्वे गेट आणि पुढे पेशवाई रस्त्याने नेरळ-कळंब जिल्हा मार्ग रस्त्यावरील साई मंदिर असे दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण नेरळ विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या निधीतून करण्यात आले. त्यातील साईमंदिर ते दामत नाला हा रस्ता मे २०१६ मध्ये डांबरीकरण करण्यात आला होता. तर डिसेंबर २०१७ मध्ये दामत गेट आणि पुढे कल्याण रस्त्यापर्यंत डांबरीकरण पूर्ण करण्यात आले होते. या डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर मार्च २०१७ मध्ये कार्पेट डांबरीकरण केले होते.या रस्त्याची अवस्था दोन महिन्यात कोसळलेल्या पावसाने फार बिकट करून ठेवली आहे. या रस्त्यावर कर्जत-कल्याण रोड ते दामत रेल्वे गेट या रस्त्यात तर अगणित मोठे खड्डे आहेत. बायपास रस्ता असल्याने वाहनचालक गाडी घुसवतात, परंतु रस्त्यावर स्वागत करणारा खड्डा एवढा मोठा आहे की तेथून गाडी पुढे नेताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. तर पुढे पहिल्या साकव पुलापर्यंत खड्डेच स्वागत करीत असतात. त्या रस्त्यातील जुन्या झालेल्या साई मंदिरपासून पहिल्या पुलापर्यंत देखील खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे दोन कोटी खर्चून डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था अशी होणार असेल तर जनतेने कशी सहनशीलता दाखवायची?असा प्रश्न आहे. दुसरीकडे अडीच कोटी खर्चून दोन पूल बांधले आहेत. त्या पुलावर टाकलेले डांबर कधीच वाहून गेले असून पुलासाठी टाकलेल्या स्लॅबचे सिमेंट देखील बाहेर पडू लागले आहे. दोन्ही पुलावर पडलेले खड्डे पाहिले की नेरळ प्राधिकरणाने केलेला खर्च हा बिनकामाचा ठरत आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता कळंब आणि कशेळे भागात जाण्याचा जवळचा मार्ग असून देखील काही कामाचा राहिला नाही. कारण खड्ड्यांनी वाहनांची पुरती वाट लागली असून या नवीन बायपास रस्त्याला दामत नाव असल्याने आमच्या गावाचे नाव खराब होत आहे.- जाबीर नजे, माजी उपसरपंच, दामत भडवळ ग्रामपंचायत
रस्त्यावरील डांबरीकरण काही ठिकाणी उखडलेले आहे, याची पाहणी आम्ही मागील आठवड्यात केली आहे. त्याची नोंद नेरळ विकास प्राधिकरण आणि रायगड जिल्हा परिषदेने घेतली आहे.- सदानंद शिर्के, उपअभियंता नेरळ विकास प्राधिकरण