रोहा : तालुक्यातील गोठणवाडी गावापासून ३०० मीटर अंतरावर जाऊचा मळा या ठिकाणी शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फाशामध्ये ६० किलो वजनाचा बिबट्या अडकून त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१२ आॅक्टोबर) मध्यरात्री घडली असावी, असा अंदाज आहे.या बिबट्याला वनरक्षक अधिकाऱ्यांनी मंगळवारी (१३ आॅक्टोबर) सुडकोली काष्ट आगारामध्ये आणले गेले. त्या बिबट्याचे वजन ६० किलो, लांबी एक मीटर २० सेंटीमीटर, उंची ७४ सेंमी असल्याची माहिती वनरक्षक अधिकाऱ्यांनी दिली. त्या बिबट्याचे पोस्टमॉर्टेम डॉ. भोजने, डॉ. सचिन आहीर यांनी केले. पोस्टमॉर्टेम केल्यानंतर बिबट्याच्या उजव्या बाजूच्या दोन्हीही पायांचे पंजे कोणीतरी कापून नेले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी रोहा डीएफओ सूर्यवंशी, भोईर, वनरक्षक पाडवी, जाधवर आदी उपस्थित होते. या बिबट्याला कोणी फास लावून मारले, हे मात्र समजू शकले नाही. आम्ही लवकरच या घटनेच्या गुन्हेगारांचा शोध लावणार असल्याचे एस. डी. सूर्यवंशी यांनी सांगितले. लवकरच मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार सुडकोली काष्ट आगारामध्ये होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
फासात अडकून बिबट्या ठार
By admin | Published: October 14, 2015 2:54 AM