रोहा नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच
By admin | Published: December 15, 2015 12:56 AM2015-12-15T00:56:41+5:302015-12-15T00:56:41+5:30
नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे रोहे नगराध्यक्षपदाची निवडणूक २३ डिसेंबरला पार पडणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या
- आविष्कार देसाई, अलिबाग
नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे रोहे नगराध्यक्षपदाची निवडणूक २३ डिसेंबरला पार पडणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच कमालीची रस्सीखेच सुरु झाली आहे. नगराध्यपदाची ही निवडणूक नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेवर राजकीय परिणाम करणारी ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
नगराध्यक्षपदासाठी समीर शेडगे, अहमद दर्जी, शिल्पा धोतरे यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू
आहे. रोहे नगर परिषदेचे नगराध्यक्ष आमदार अवधूत तटकरे यांनी ११ डिसेंबर २०१५ ला राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे.
महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१ (९) प्रमाणे जिल्हाधिकारी शीतल तेली -उगले यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक २३ डिसेंबरला जाहीर केली. २३ डिसेंबरला विशेष सभेद्वारे ही निवडणूक पार पडणार आहे. याआधी १८ जुलै २०१४ ला नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली होती. त्यामुळे २३ डिसेंबरला बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेद्वारे निवडून येणाऱ्या अध्यक्षपदाचा कालावधी हा २४ डिसेंबर २०१५ पासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीपैकी उर्वरित कालावधीकरिता राहणार आहे.
सध्या नगर पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, शिवसेनाप्रणीत दोन आणि काँग्रेसचे दोन अशी एकूण १७ सदस्य संख्या आहे. नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे समीर शेडगे, अहमद दर्जी, पूर्वी मोहिते, रत्नप्रभा कापरे, संतोष पोटफोडे, शिल्पा धोतरे, जितेंद्र पडवळ, दीपक तेंडुलकर, संजीवनी पोटफोडे आणि अवधूत तटकरे असे एकसे एक उमेदवार असल्याचे बोलले जाते.
नगराध्यक्षपदाची माळ आपल्याच गळ््यात पडावी यासाठी इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा आमदार सुनील तटकरे यांचा निर्णय यामध्ये अंतिम राहणार असल्याने ते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले
आहे.
खालापूर, माणगाव, पोलादपूर, म्हसळा आणि तळा येथे १० जानेवारीला नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपापसात अध्यक्षपदाचा वाटून घेतलेला कार्यकाळही याच कालावधीत संपणार आहे. त्यामुळे रोहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. निवडणुकीत कोण विजयी होणार याची उत्सुक्ता सर्वांना आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
- १६, १७ डिसेंबर २०१५ रोजी कार्यालयीन वेळेत आणि १८ डिसेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज रोहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहेत.
- अर्जाचा छाननी १८ डिसेंबर दुपारी दोन वाजल्यानंतर होणार आहे.
- उमेदवाराचे अर्ज फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची नावे आणि कारणे १८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रसिध्द करणे
- पीठासीन अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करणे १८ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजल्यापासून ते २१ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत
- वैध अर्ज प्रसिध्द करणे २१ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजल्यानंतर
- उमेदवारी मागे घेणे २२ डिसेंबरला दुपारी ४ वाजेपर्यंत.
- अंतिम यादी प्रसिध्द करणे २२ डिसेंबरला ४ वाजल्यानंतर
- निवडणूक लढविणाऱ्या आणि मागे घेतलेल्यांची नावे सभेत वाचून दाखविणे २३ डिसेंबरला ०१.०५ वाजल्यानंतर
- अध्यक्षपदाची निवडणूक आणि निकाल घोषित करणे २३ डिसेंबरला दुपारी ०१.१० नंतर
- २३ डिसेंबरला विशेष सभेद्वारे ही निवडणूक पार पडणार आहे.
- नगर पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, शिवसेनाप्रणीत दोन आणि काँग्रेसचे दोन अशी एकूण १७ सदस्य संख्या आहे.