धाटाव : पिण्याचे पाणी नाही, खड्ड्यांचा रस्ता, भटक्या कुत्र्यांचा वावर, नादुरु स्त पंखे, दुचाकी वाहनांचा अडथळा, तोडकी मोडकी आसने, कचऱ्याचे साम्राज्य असे विदारक चित्र सध्या रोहे बसस्थानकात पहावयास मिळत आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना हे रोह्याचे बसस्थानक जणू गैरसोयींचे आगार आहे की काय, असा प्रश्न पडत आहे.रोहे बसस्थानकातून अक्कलकोट, सोलापूर, सांगली, तुळजापूर, पंढरपूर, सातारा, शिर्डी, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, जळगावकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या दररोज धावतात. तर जिल्ह्याच्या अलिबाग, पेण, पनवेल, महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, मुरु ड, खोपोली इतर ठिकाणीही एसटीच्या फेऱ्या होतात. रोहा बसस्थानकातून लाखो प्रवासी प्रवास करताना दिसतात. मात्र, येथे येणाऱ्या प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकातील रस्त्यांची पावसाळ्याआधी डागडुजी केली असली तरी रस्त्यात दगडांनी पुन्हा डोके वर काढले आहे. पंख्यांची नादुरुस्त अवस्था आहे. याठिकाणी भटक्या कुत्र्यांनी दहशत पसरविली आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी कूलर असून पाणी नाही. तर कूलरवर कागदी पुठ्यांचा खच पडला आहे. (वार्ताहर)
रोहा बसस्थानकाची दुरवस्था
By admin | Published: September 30, 2015 12:10 AM