रोह्यात शेतजमिनीचा गैरव्यवहार, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 06:29 AM2017-10-20T06:29:16+5:302017-10-20T06:29:32+5:30
मुंबई व पुणे येथील सात जणांनी संगनमत करून, मूळ जमीन मालकाऐवजी तोतया जमीन मालकाला उभे करून लाखो रुपये किमतीच्या शेतजमिनीचा गैरव्यवहार करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रोह्यात घडला आहे.
रोहा : मुंबई व पुणे येथील सात जणांनी संगनमत करून, मूळ जमीन मालकाऐवजी तोतया जमीन मालकाला उभे करून लाखो रुपये किमतीच्या शेतजमिनीचा गैरव्यवहार करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रोह्यात घडला आहे. बनवाबनवी करणाºया सात जणांविरोधात पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट सरकारी कागदपत्रे तयार करणे व त्यांचा गैरवापर करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रोहा-चणेरा मार्गावरील शेडसई येथे हर्षद किशोरचंद मोदी (रा.विलेपार्ले, मुंबई) यांच्या मालकीची जमीन व फार्महाऊस आहे. सुटीनिमित्त मोदी परिवार व त्यांचे मित्रमंडळ या ठिकाणी येत असत. असे असताना मागील दीड ते दोन वर्षांपासून ते या ठिकाणी येत नाहीत या संधीचा गैरफायदा घेत पुणे व मुंबईतील सात जणांनी संगनमत करून जमीनमालक हर्षद मोदी यांचे नाव वापरून मुखत्यारपत्र लिहून देणाºया एका अनोळखी तोतया व्यक्तीशी संगनमत करून जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करून परस्पर विक्र ी केली व मूळ जमीन व फार्महाऊस मालकांची फसवणूक केली. असे असताना काही दिवसांपूर्वी हर्षद मोदी आपल्या पत्नी समवेत रोह्यातील तलाठी कार्यालयात धारा भरण्यासाठी व नूतन सातबारा मिळावे याकरिता आले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे दोन लाख रु. किमतीची आपल्या मालकीची जमीन व फार्महाऊस परस्पर विकल्याचे समजताच मोदी दाम्पत्याच्या पायाखालची वाळूच सरकली.
हा प्रकार १५ आॅक्टोबर रोजी घडला असून पोलिसांनी रवींद्र यशवंत मेहेंदळे (रा. लोकमान्य पुणे), मीना जोशी (रा.सासवड, पुणे), अजय शांताराम धीवार (रा. पुरंदर, पुणे), सुप्रिया शंकर गद्रे (रा. बांद्रा, मुंबई), समिक्षा रवींद्र मेहेंदळे (रा. निर्मलबाग, पुणे), मुस्तफा काझी (रा. कोंढवी-मुंबई) व अन्य एक अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पो.नि.विकास रामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रशांत तायडे अधिक तपास करीत आहेत.