रोहा / धाटाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गेली पंधरा वर्षे निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या राष्ट्रवादीला शेकापबरोबर युती करूनही वर्चस्व राखता न आल्याने रोह्यात राष्ट्रवादीला संमिश्र यश मिळाले. पंचायत समितीमध्ये शेकाप-राष्ट्रवादीला पाच व सेना-काँग्रेस आघाडीला तीन असे बलाबल झाल्याने राष्ट्रवादीला पंचायत समितीतील सत्ता राखण्यात यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी प्रतिष्ठेची जागा तब्बल ८८५८ अशा विक्र मी मताधिक्याने जिंकली. मात्र, नागोठणे जिल्हा परिषद गटातील सर्व जागांसह आंबेवाडी गणाची प्रतिष्ठेची जागा राष्ट्रवादीकडून खेचून घेत, शिवसेना-काँग्रेस आघाडीने जिंकली. वरसे जिल्हा परिषद गटात आदिती तटकरे विजयी झाल्या. जिल्हा शिवसेना सल्लागार किशोर जैन यांनी नागोठण्याची जागा जिंकून पराभवाची मालिका संपवली. सेना-काँग्रेसचे बिलाल कुरेशी विजयी झाले. ऐनघर गणात शेकाप-राष्ट्रवादी आघाडीचे भालचंद्र शिर्के यांना सेनेच्या संजय भोसले यांनी पराभूत करत आघाडीला धक्का दिला. आंबेवाडी गटातून दयाराम पवार विजयी झाले. आंबेवाडी पंचायत समिती गणात शिवसेनेच्या चेतना लोखंडे विजयी झाल्या. खांब गणातून राष्ट्रवादीच्या वीणा चितळकर या ५२२९ मते मिळवित विजयी झाल्या. धाटाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या विजया विनोद पाशिलकर ५८५७ मतांनी विजयी झाल्या. वरसे गणातून राष्ट्रवादीच्या राजश्री पोकळे विजयी झाल्या. शेकापने प्रतिष्ठेची बनवलेली खारगावची जागा शेकापच्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आस्वाद पाटील यांनी ६८४३ इतक्या मताधिक्याने जिंकली. खारगाव गणात राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या गुलाब वाघमारे विजयी झाल्या, विरझोली गणात राष्ट्रवादीचे रामचंद्र सकपाळ विजयी झाले. छाननीत अवैध मतांचे प्रमाण मोठे होते.
रोहा पं. समितीवर राष्ट्रवादीला बहुमत
By admin | Published: February 24, 2017 7:54 AM